(गुहागर / प्रतिनिधी)
निर्मल ग्रामपंचायत काताळे येथील तंटामुक्ती समितीच्या अध्यक्षपदी श्री. विजय मोहिते यांची सर्वानुमते आणि बिनविरोध फेरनिवड करण्यात आली. गावातील अंतर्गत वाद-विवाद आपसात सामोपचाराने मिटवून सामाजिक सलोखा आणि शांतता कायम राखण्याच्या उद्देशाने ग्रामस्थांनी पुन्हा एकदा त्यांच्यावर विश्वास व्यक्त केला आहे.
ही निवड जिल्हा परिषद सदस्य तथा पशुसंवर्धन सभापती श्री. महेश नाटेकर यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडली. विजयजी मोहिते यांची फेरनिवड झाल्याने गावात आनंदाचे वातावरण निर्माण झाले. ग्रामस्थांच्या वतीने पुष्पगुच्छ देऊन त्यांचे उत्साहात अभिनंदन करण्यात आले. यावेळी गावातील प्रतिष्ठित नागरिक, ग्रामपंचायत सदस्य तसेच तरुण वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होता.
नवनिर्वाचित अध्यक्ष श्री. विजय मोहिते यांनी मनोगत व्यक्त करताना सांगितले, “गावातील एकता टिकवणे, आपसातील तंटे समोपचाराने मिटवणे आणि ग्रामस्थांच्या सहकार्याने गावाचा विकास साधणे हेच माझे मुख्य ध्येय राहील.”
कार्यक्रमाच्या शेवटी उपस्थितांनी नवनिर्वाचित अध्यक्ष विजयजी मोहिते यांना पुढील वाटचालीसाठी तसेच सामाजिक कार्यासाठी मनःपूर्वक शुभेच्छा दिल्या.

