(रत्नागिरी)
ग्रामीण भागातील बालकांना सुरक्षित, स्वच्छ, आकर्षक आणि गुणवत्तापूर्ण शिक्षणाचे वातावरण उपलब्ध करून देण्यासाठी मुकुल माधव फाऊंडेशनने महत्त्वपूर्ण पाऊल उचलले आहे. फिनोलेक्स इंडस्ट्रीजला ४५ वर्षे पूर्ण झाल्याच्या पार्श्वभूमीवर कंपनीच्या सामाजिक उत्तरदायित्व (CSR) उपक्रमांतर्गत रत्नागिरी तालुक्यातील गोळप आणि फणसोप परिसरातील सहा अंगणवाड्यांचे नूतनीकरण करण्यात आले असून या अंगणवाड्यांचे उद्घाटन नुकतेच उत्साहपूर्ण वातावरणात पार पडले.
मुकुल माधव फाऊंडेशनच्या व्यवस्थापकीय विश्वस्त सौ. रितू प्रकाश छाब्रिया आणि फिनोलेक्स इंडस्ट्रीज लिमिटेडचे एक्झिक्युटिव्ह चेअरमन श्री. प्रकाश प्रल्हाद छाब्रिया यांच्या दूरदृष्टीतून हा उपक्रम साकारण्यात आला आहे. ग्रामीण भागातील बालकांच्या सर्वांगीण विकासासाठी आवश्यक असलेल्या शैक्षणिक आणि पायाभूत सुविधांमध्ये सुधारणा करून त्यांना अधिक सक्षम शिक्षण वातावरण उपलब्ध करून देण्याचा या प्रकल्पामागील मुख्य उद्देश आहे.
बालकांच्या व्यक्तिमत्त्व विकासाची आणि शिक्षणाची भक्कम पायाभरणी अंगणवाड्यांमधून होत असते. ही बाब लक्षात घेऊन या प्रकल्पांतर्गत संबंधित अंगणवाड्यांचे सर्वंकष नूतनीकरण करण्यात आले. स्वच्छ आणि आकर्षक परिसर, सुधारित इमारती, बालमैत्रीपूर्ण वातावरण, रंगीबेरंगी आणि शैक्षणिक संदेश देणाऱ्या ‘बोलक्या भिंती’, दर्जेदार स्वच्छतागृह सुविधा तसेच विविध शैक्षणिक साहित्य उपलब्ध करून देण्यात आले आहे. त्यामुळे या अंगणवाड्यांमध्ये शिक्षण घेणाऱ्या बालकांच्या बौद्धिक, शारीरिक आणि सामाजिक विकासाला निश्चितच चालना मिळणार आहे.
मुकुल माधव फाऊंडेशन शिक्षण, आरोग्य, महिला सक्षमीकरण, ग्रामीण विकास आणि सामाजिक उन्नती या विविध क्षेत्रांत सातत्याने कार्यरत आहे. समाजातील वंचित आणि गरजू घटकांच्या जीवनमानात सकारात्मक बदल घडवून आणण्यासाठी फाऊंडेशनकडून अनेक उपक्रम राबवले जातात. गोळप आणि फणसोप येथील अंगणवाड्यांचे नूतनीकरण हा त्याच सामाजिक बांधिलकीचा एक महत्त्वपूर्ण भाग आहे.
या उपक्रमाअंतर्गत गोळप गावातील रनपार, गुरववाडी, गोळप सडा आणि शिरंबाडवाडी येथील अंगणवाड्या तसेच फणसोप गावातील फणसोप (मराठी) आणि मागलाड येथील अंगणवाड्यांचे नूतनीकरण करण्यात आले. इमारतींची दुरुस्ती, रंगरंगोटी, सुरक्षित आणि स्वच्छ परिसराची निर्मिती, बालकांसाठी आवश्यक मूलभूत सुविधा आणि शैक्षणिक साहित्य यामुळे या अंगणवाड्यांना नवसंजीवनी मिळाली आहे.
गोळप येथील उद्घाटन कार्यक्रमास रत्नागिरीच्या अॅडव्होकेट, समाजसेविका आणि मुकुल माधव फाऊंडेशनच्या सल्लागार श्रीमती रुची महाजनी तसेच अॅड. गौरव महाजनी हे प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होते. यावेळी गोळप ग्रामपंचायतीच्या सरपंच प्रियांका पंकज सुर्वे, उपसरपंच संदीप तोडणकर, माजी सरपंच उमंग साळवी, कंत्राटदार सुयोग आंबेरकर आणि ओंकार भेकरे यांच्यासह ग्रामस्थ, अंगणवाडी सेविका तसेच फाऊंडेशन आणि फिनोलेक्सचे प्रतिनिधी उपस्थित होते.
फणसोप येथील कार्यक्रमास युवा सेना जिल्हाप्रमुख तुषार साळवी, पंचायत समिती सदस्या अर्चना साळवी, सरपंच राधिका साळवी, माजी सरपंच गिरीराज साळवी, फणसोप विविध कार्यकारी सेवा सहकारी सोसायटीचे चेअरमन मनोज साळवी, ग्रामपंचायत सदस्य राकेश साळवी आणि मिलिंद कांबळे यांच्यासह ग्रामस्थ, विद्यार्थी आणि अंगणवाडी कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
फिनोलेक्स इंडस्ट्रीज लिमिटेडच्या वतीने रामबाबू सांका (डायरेक्टर – टेक्निकल), सागर चिवटे (फॅक्टरी मॅनेजर), नंदकिशोर शिंपी (प्लांट एचआर हेड), अमित घोरपडे (हेड – सिव्हिल), विकास कुरतडकर आणि आशिष आठवले उपस्थित होते. तर मुकुल माधव फाऊंडेशनच्या वतीने शुभम भेगडे, शामराव निंबाळकर आणि वरद गोरे यांनी कार्यक्रमाच्या आयोजनात सक्रिय सहभाग घेतला.
यावेळी उपस्थित मान्यवरांनी मुकुल माधव फाऊंडेशनच्या व्यवस्थापकीय विश्वस्त सौ. रितू प्रकाश छाब्रिया यांच्या समाजाभिमुख दृष्टिकोनाचे आणि ग्रामीण भागातील बालविकासासाठी सुरू असलेल्या विविध उपक्रमांचे विशेष कौतुक केले. या प्रकल्पाच्या यशस्वी अंमलबजावणीसाठी स्थानिक ग्रामपंचायती, अंगणवाडी सेविका, ग्रामस्थ, कंत्राटदार आणि सर्व संबंधितांचे सहकार्य लाभल्याबद्दल आभारही व्यक्त करण्यात आले.
ग्रामीण भागातील बालकांना अधिक चांगले, सुरक्षित आणि प्रेरणादायी शैक्षणिक वातावरण उपलब्ध करून देण्याच्या दिशेने उचललेले हे पाऊल भविष्यातील पिढी घडविण्यासाठी निश्चितच महत्त्वपूर्ण ठरणार असल्याची भावना यावेळी व्यक्त करण्यात आली.

