(संगमेश्वर/ रत्नागिरी प्रतिनिधी)
तालुक्यातील आमकरवाडी (गोळवली) दत्तमंदिर परिसरातील ग्रामस्थांनी वृद्ध महिलेला होत असलेल्या अमानुष वागणुकीबाबत संगमेश्वर पोलिस ठाण्यात तक्रार दाखल करीत एक गंभीर प्रकरण उजेडात आणले आहे. रुक्मिणी विठोबा आमकर (वय अंदाजे ९०) या आजारपणामुळे पूर्णपणे अंथरुणाला खिळलेल्या असून, त्यांच्या एकुलत्या मुलाकडून व सुनेकडून होणाऱ्या दुर्लक्ष व छळाची नोंद ग्रामस्थांनी लेखी स्वरूपात केली आहे.
तक्रारीनुसार, रुक्मिणी आमकर यांची दैनंदिन देखभाल—जेवण, पाणी, स्वच्छता या कोणत्याही बाबीकडे मुलगा महादेव विठोबा आमकर व संबंधित सुना यांचे पूर्ण दुर्लक्ष होत आहे. शिवीगाळ, मानसिक छळ आणि मानवीपणाला तिलांजली देणारी वागणूक यामुळे वृद्ध मातेची परिस्थिती अधिकच बिकट झाल्याचे ग्रामस्थांनी नमूद केले आहे. दरम्यान, महादेव आमकर हे वृद्ध मातेला अशा अवस्थेत घरात एकट्याच ठेवून मुंबईला गेल्याने त्यांच्या सुरक्षेविषयी गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. “या वृद्ध महिलेच्या आरोग्याला किंवा जीवाला धोका निर्माण झाल्यास जबाबदार कोण?” असा थेट सवाल ग्रामस्थांनी उपस्थित केला आहे.
ग्रामस्थांनी दाखल केलेल्या अर्जात ज्येष्ठ नागरिकांच्या देखभाल व कल्याण अधिनियम 2007 तसेच भा.दं.सं. कलम 151 अंतर्गत संबंधित मुलांवर तातडीने कारवाईची मागणी करण्यात आली आहे. पंचक्रोशीतील इतर कुटुंबांसाठीही हा प्रकरण दृष्टी देणारा ठरावा, अशी अपेक्षा तक्रारकर्त्यांनी व्यक्त केली. या संपूर्ण घटनेत पोलिस प्रशासनाने त्वरित हस्तक्षेप करून रुक्मिणी आमकर यांना संरक्षण देणे तसेच दोषींवर कठोर कारवाई करणे आवश्यक असल्याचे ग्रामस्थांनी स्पष्ट केले आहे. संगमेश्वर पोलिसांकडून या तक्रारीवर पुढील चौकशी लवकरच सुरू होण्याची शक्यता आहे.

