(ठाणे / अंबरनाथ)
अंबरनाथमध्ये हुंड्यासाठीच्या कथित छळाला कंटाळून 26 वर्षीय नवविवाहितेने आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. लग्नानंतर अवघ्या दीड महिन्यात घडलेल्या या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली असून, पोलिसांनी मृत विवाहितेच्या डॉक्टर पतीस अटक केली आहे. तसेच पतीसह सासरच्या मंडळींविरोधात विविध कलमांन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मृत महिलेचे नाव विशाखा टिळेकर (वय 26) असे असून तिचा विवाह 30 एप्रिल 2026 रोजी डॉ. नितीन टिळेकर याच्याशी झाला होता. लग्नापूर्वी सर्व काही सुरळीत होते. मात्र विवाहानंतर हुंड्यासाठी मानसिक आणि शारीरिक छळ सुरू झाल्याचा आरोप विशाखाच्या कुटुंबीयांनी केला आहे.
कुटुंबीयांच्या तक्रारीनुसार, लग्नात अपेक्षित मानपान मिळाले नाही तसेच माहेरून पैसे आणि दागिने आणले नाहीत, या कारणांवरून विशाखाचा सतत छळ केला जात होता. याशिवाय तिच्या हालचालींवर लक्ष ठेवण्यासाठी घरात आणि घराबाहेर सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्यात आले होते. तिला माहेरच्यांशी संपर्क ठेवण्यासही मज्जाव करण्यात आल्याचा आरोप करण्यात आला आहे.
विशाखाने आत्महत्येपूर्वी तिच्यावर होत असलेल्या त्रासाची माहिती आईला दिली होती. त्यानंतर कुटुंबीय तिला माहेरी घेऊन जाण्याची तयारी करत असतानाच तिने राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केल्याचे सांगण्यात येत आहे. तसेच, आत्महत्येच्या दोन दिवसांपूर्वी शेजारच्या महिलेशी बोलल्याच्या कारणावरून पतीने तिची मारहाण केल्याचाही आरोप नातेवाईकांनी केला आहे.
या प्रकरणी शिवाजीनगर पोलिसांनी आत्महत्येस प्रवृत्त करणे, हुंड्यासाठी छळ करणे आणि इतर संबंधित कलमांनुसार गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांनी डॉ. नितीन टिळेकर याला अटक केली असून प्रकरणाचा पुढील तपास सुरू आहे. दरम्यान, या प्रकरणामुळे हुंडाबळी आणि महिलांवरील कौटुंबिक अत्याचाराचा मुद्दा पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.

