( नवी मुंबई )
नवी मुंबईतील सिबीडी परिसरात एक धक्कादायक आणि गूढ प्रकार समोर आला आहे. महानगरपालिकेच्या रात्रनिवारा केंद्रात राहणाऱ्या एका महिलेने आपण माजी भारतीय क्रिकेटपटू सलीम दुराणी यांची पत्नी असल्याचा दावा केल्याने परिसरात खळबळ उडाली आहे. स्मृतिभ्रंश झाल्याचे सांगितले जाणाऱ्या या महिलेचा दावा खरा की खोटा, याबाबत सध्या संभ्रम कायम आहे.
रस्त्यावर फिरताना पोलिसांना आढळली होती महिला
सीबीडी पोलिसांना 26 नोव्हेंबर रोजी एक महिला रस्त्यावर भरकटत फिरताना आढळून आली. तिची अवस्था पाहता पोलिसांनी तिला तात्काळ महानगरपालिकेच्या घणसोली येथील रात्रनिवारा केंद्रात दाखल केले. चौकशीत महिलेने आपले नाव रेखा श्रीवास्तव असल्याचे सांगितले.
‘माझ्याकडे बंगला, गाडी सर्व काही होते’ – महिलेचा दावा
रात्रनिवारा केंद्रात असताना या महिलेने आपण क्रिकेटपटू सलीम दुराणी यांची पत्नी असल्याचा दावा केला. “माझ्याकडे बंगला, गाडी आणि सर्व सुखसोयी होत्या, मात्र काही परिचितांनी ते सर्व हडप केले,” असा दावा तिने केल्याचे कर्मचाऱ्यांनी सांगितले. तिच्या या विधानांमुळे प्रकरण अधिक गूढ बनले आहे. महिलेच्या दाव्याची सत्यता तपासण्यासाठी रात्रनिवारा केंद्रातील कर्मचाऱ्यांनी आणि पोलिसांनी अधिक माहिती मिळवण्याचा प्रयत्न केला. मात्र, अद्याप कोणतीही अधिकृत पुष्टी किंवा कागदपत्रे उपलब्ध होऊ शकलेली नाहीत. सध्या या महिलेवर महानगरपालिका रुग्णालयात वैद्यकीय उपचार सुरू असून, तिची मानसिक स्थिती लक्षात घेता तिला रात्रनिवारा केंद्रात राहण्याची व्यवस्था करण्यात आली आहे.
दावा खरा की खोटा? तपास सुरू
या महिलेचा सलीम दुराणी यांच्याशी नेमका संबंध आहे की नाही, हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. स्मृतिभ्रंशामुळे तिने असा दावा केला आहे की खरोखरच तिच्या आयुष्यात काही गंभीर घटना घडल्या आहेत, याचा तपास सुरू आहे. या गूढ दाव्यामुळे सध्या चर्चेला उधाण आले असून, पुढील तपासानंतरच सत्य समोर येणार आहे.

