( अहमदाबाद )
गुजरात दहशतवादविरोधी पथकाने (एटीएस) गुंतागुंतीचा आणि धोकादायक दहशतवादी कट उधळून लावल्याचा दावा केला आहे. शहराच्या कलोल परिसरात केलेल्या थरारक कारवाईत तीन संशयितांना अटक करण्यात आली आहे; त्यांच्या ताब्यातून दोन ग्लॉक पिस्तूल, एक बेरेटा पिस्तूल, ३० जिवंत काडतुसे आणि रिसिन विष तयार करण्यासाठी वापरली जाणारी सुमारे ४ लिटर एरंडेल तेल असा मोठा साठा जप्त करण्यात आला.
एटीएसने दिलेल्या माहितीनुसार डॉ. अहमद मोहिउद्दीन सय्यद, मोहम्मद सुहेल आणि आझाद यांना अटक करण्यात आली आहे. या तिघांपैकी एका आरोपीला पोलीस अधिक तपासासाठी १७ नोव्हेंबरपर्यंत कोठडी सुनावण्यात आली आहे. एटीएसचे डीआयजी सुनील जोशी यांनी सांगितले की, या आरोपींचा थेट संपर्क परदेशी दहशतवादी संघटनांशी असल्याचा एक संदेश मिळाल्यानंतर त्यांचा शोध घेण्यात आला.
माहितीनुसार, आरोपी डॉ. अहमद सय्यद याने चीनमधून वैद्यकीय शिक्षण (MBBS) घेतले आहे आणि त्याचा परदेशी दहशतवादी यांचेशी संपर्क सुरू होता. एटीएसने सांगितले की या टोळीने रिसिन नावाचे अत्यंत विषारी द्रव्य (रिपोर्टनुसार ‘रायजिन’ असे उल्लेख) तयार करण्याचा प्रयत्न केला होता, हे द्रव्य सायनाइडपेक्षा जास्त घातक आहे, असा प्रारंभिक अंदाज तज्ञांनी व्यक्त केला आहे.
गुजरात ATS च्या पथकाने २ दिवसांआधी अडालज टोल प्लाझाजवळ या तिघांना अटक केली. ते कारमधून शस्त्रे, लिक्विड केमिकल घेऊन जात होते. या तिघांचा तपास केला असता ते परदेशात बसलेले ISKP च्या माणसांशी संपर्कात होते. तो मोहम्मद सुहेल आणि आझाद सैफी या दोन इतर कट्टरपंथी तरुणांसह दहशतवादी हल्ल्याची तयारी करत होता.
अटक केलेल्या संशयितांच्या हालचालींचा तपास करताना एटीएसला असे आढळले की ते लखनौ, दिल्ली आणि अहमदाबाद यांसारख्या गर्दीच्या ठिकाणी रेकी करत होते; त्यांच्या हालचाली काश्मीरपर्यंत नोंदवल्या गेल्या आहेत. शस्त्रस्त्रोत म्हणून पाकिस्तानातून ड्रोनद्वारे शस्त्रपुरवठा झाल्याचे संशयही तपासात समोर आले असून, मास्टरमाइंड पाकिस्तानात असल्याचा आरोप आहे. शस्त्रांची डिलिव्हरी राजस्थानमधील हनुमानगड येथून घेऊन ती कलोल येथे आणण्यात आली होती, असे एटीएसने म्हटले आहे.
एटीएसचा असा दावा आहे की या टोळीचा उदिष्ट देशभरात मोठ्या प्रमाणावर जीवितहानी करणे होते. विशेषतः पाणी साठ्यात विष मिसळून जनसंख्येवर मोठा हल्ला घडवण्याचा कट आखण्यात आला होता. मात्र एटीएसच्या वेळेवर कारवाईमुळे हा कट उधळला गेला आहे. या तपासात केंद्रीय सुरक्षा यंत्रणांचीही साथ मिळाली असल्याचे अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले.
सध्या या तीनही संशयितांविरुद्ध अधिक सखोल तपास आणि आंतरराष्ट्रीय संपर्कांची चौकशी सुरू आहे. एटीएसने जप्त केलेल्या साहित्याचे फॉरेन्सिक परीक्षण आणि टेलिग्राम आयडी, संवाद व शस्त्रपुरवठ्याचा स्रोत यांचा तपास तीव्र गतीने सुरू ठेवला आहे.

