(राजापूर / तुषार पाचलकर)
राजापूर तालुक्यातील पाचल गावच्या सामाजिक व शैक्षणिक क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या सौ. धनश्री दत्तात्रय मोरे यांना जिल्हा महिला व बाल विकास विभागाकडून जाहीर करण्यात आलेला प्रतिष्ठेचा ‘पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर’ पुरस्कार आज महाराष्ट्र दिनानिमित्त १ मे रोजी रत्नागिरी येथील पोलीस परेड ग्राउंडवर प्रदान करण्यात आला. पालकमंत्री उदय सामंत यांच्या हस्ते हा सन्मान त्यांना देण्यात आला.
यावेळी त्यांच्या पती श्री दत्तात्रय मोरे, रत्नागिरीच्या सौ. शिल्पा सुर्वे तसेच विविध मान्यवर उपस्थित होते. पुरस्कार स्वीकारताना सौ. मोरे यांचा सन्मानपत्र व स्मृतिचिन्ह देऊन गौरव करण्यात आला.
सौ. मोरे गेली अनेक वर्षे सामाजिक कार्यात सक्रिय असून महिलांच्या अडचणी सोडविणे, गरजू घटकांना मदत करणे, तसेच शैक्षणिक व सामाजिक क्षेत्रात योगदान देणे यासाठी ओळखल्या जातात. त्यांच्या या सातत्यपूर्ण व निस्वार्थ कार्याची दखल घेत त्यांची या पुरस्कारासाठी निवड करण्यात आली होती.
हा सन्मान मिळाल्याबद्दल पाचल गावासह संपूर्ण राजापूर तालुका व रत्नागिरी जिल्ह्यातून त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.

