(रत्नागिरी/ प्रतिनिधी)
टीईटी परीक्षा घोटाळ्याच्या संशयामुळे नियुक्तीपासून दूर राहिलेल्या जिल्हा परिषदेच्या सात शिक्षण सेवक उमेदवारांना अखेर दिलासा मिळाला आहे. पुणे सायबर पोलिसांच्या पडताळणी अहवालात या सात उमेदवारांचा घोटाळ्यात समावेश नसल्याचे स्पष्ट झाल्यानंतर, त्यांच्याकडून प्रतिज्ञापत्र घेऊन नियुक्तीपत्रे देण्याचा निर्णय जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागाने घेतला आहे. त्यामुळे दीर्घकाळापासून नियुक्तीच्या प्रतीक्षेत असलेल्या या उमेदवारांचा मार्ग मोकळा झाला आहे.
जिल्हा परिषदेच्या पवित्र पोर्टलमार्फत राबविण्यात आलेल्या शिक्षक भरती प्रक्रियेत एकूण ४३३ शिक्षण सेवकांना नियुक्तीपत्रे देण्यात आली होती. मात्र, यापैकी १३ उमेदवार टीईटी परीक्षा घोटाळ्याशी संबंधित असल्याचा संशय व्यक्त झाल्याने त्यांच्या नियुक्तीबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले होते. या सर्व उमेदवारांची प्रकरणे पडताळणीसाठी पुणे सायबर पोलिसांकडे पाठविण्यात आली होती. सायबर पोलिसांनी केलेल्या तपासानंतर त्यासंबंधीचा अहवाल जिल्हा परिषदेकडे सादर केला आहे. या अहवालानुसार, संशयाच्या यादीतील १३ पैकी सात उमेदवारांचा टीईटी घोटाळ्यात समावेश नसल्याचे स्पष्ट झाले आहे. तथापि, भविष्यात या प्रकरणाशी संबंधित कोणतीही बाब निष्पन्न झाल्यास प्रशासकीय अडचण निर्माण होऊ नये, यासाठी खबरदारीचा उपाय म्हणून संबंधित उमेदवारांकडून प्रतिज्ञापत्र घेण्यात येणार आहे. भविष्यात घोटाळ्यात नाव निष्पन्न झाल्यास आपल्याला अपात्र ठरविण्याची कारवाई मान्य असल्याची हमी या प्रतिज्ञापत्राद्वारे घेतली जाणार आहे. त्यानंतर या सात उमेदवारांना नियुक्तीपत्रे देण्याची प्रक्रिया पूर्ण केली जाईल.
दरम्यान, उर्वरित सहा उमेदवारांबाबतचा पडताळणी अहवाल अद्याप प्राप्त झालेला नाही. त्यामुळे या सहा जणांच्या नियुक्त्या सध्या प्रलंबित ठेवण्यात आल्या आहेत. संबंधित अहवाल प्राप्त झाल्यानंतरच त्यांच्या नियुक्तीबाबत पुढील निर्णय घेतला जाण्याची शक्यता आहे. एकीकडे सात उमेदवारांच्या नियुक्तीचा मार्ग मोकळा झाला असला, तरी उर्वरित सहा उमेदवारांच्या प्रकरणांचा निकाल अद्याप लागलेला नाही. त्यामुळे त्यांच्या नियुक्तीबाबत सायबर पोलिसांच्या पुढील अहवालाकडे लक्ष लागले आहे.


