(रत्नागिरी / प्रतिनिधी)
मुक्या प्राण्यावरील क्रूरतेला विरोध केल्याचा राग मनात धरून एका तरुणावर सुरीने हल्ला केल्याची धक्कादायक घटना शहरातील साळवी स्टॉप झोपडपट्टी परिसरात घडली. या घटनेत एका २३ वर्षीय तरुणाच्या हाताला दुखापत झाली असून, शहर पोलिसांनी संशयिताविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, अर्जुन रतन शिंदे (वय २३) हे सोमवारी सकाळी आपल्या नातेवाईकाच्या झोपडीसमोर बसले होते. त्यावेळी परिसरात उभ्या असलेल्या एका कुत्र्याला आरोपी विशाल विलास शिंदे (वय २५) याने लाथ मारून हाकलण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे कुत्रा भुंकू लागला. त्यानंतर आरोपीने त्या कुत्र्याला दगड मारण्याचा प्रयत्न केल्याचे सांगितले जाते. यावेळी अर्जुन शिंदे यांनी, “त्या मुक्या प्राण्याला कशाला मारतोस, त्याने तुझे काय बिघडवले आहे?” असा जाब विचारला. या बोलण्याचा राग आल्याने आरोपीने फिर्यादीला धमकी देत शिवीगाळ केली. त्यानंतर तो घरी जाऊन सुरी घेऊन आला आणि अर्जुन शिंदे यांच्या डाव्या हाताच्या पंजावर वार केल्याचा आरोप आहे. तसेच हाताने मारहाण करून दुखापत केल्याचेही फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे.
या हल्ल्यात अर्जुन शिंदे जखमी झाले असून त्यांच्यावर उपचार करण्यात आले. घटनेनंतर रत्नागिरी शहर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली. या प्रकरणी पोलिसांनी आरोपी विशाल शिंदे याच्याविरुद्ध भारतीय न्याय संहिता २०२३ मधील दुखापत, मारहाण, शिवीगाळ आणि धमकी देण्यासंदर्भातील विविध कलमांन्वये शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला असून पुढील तपास सुरू आहे.

