( लांजा / वार्ताहर )
‘माझं गाव आरोग्य संपन्न गाव’ अभियानांतर्गत आंजणारी येथील जिल्हा परिषद शाळेत मंगळवारी (दि. १६ जून) रक्तदान व आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. प्राथमिक आरोग्य केंद्र जावडे अंतर्गत उपकेंद्र वेरळ, रिक्षा व्यावसायिक संघटना आंजणारी, बी.के.एल. वालावलकर हॉस्पिटल डेरवण आणि स्वामी समर्थ रक्तपेढी डेरवण यांच्या संयुक्त विद्यमाने हा उपक्रम राबविण्यात आला.
शिबिराचे उद्घाटन पंचायत समिती लांजाच्या सभापती मानसी आंबेकर, जिल्हा परिषद सदस्य संतोष रेवाळे आणि आरोग्य समिती सदस्या मनीषा लाखण यांच्या हस्ते झाले.
या शिबिरात १९ रक्तदात्यांनी रक्तदान करून सामाजिक बांधिलकी जपली. विशेष म्हणजे तालुका आरोग्य अधिकारी डॉ. प्रशांतकुमार परगे आणि डॉ. सूरज पेटकर यांनी शिबिराला भेट देऊन स्वतः रक्तदान केले. तसेच आशा स्वयंसेविका प्रभावती शिखरे यांनीही रक्तदान करून आदर्श निर्माण केला.
शिबिरादरम्यान नागरिकांची असंसर्गजन्य आजारांची तपासणी, हिमोग्लोबिन, रक्तातील साखरेची पातळी (शुगर) तसेच ईसीजी तपासणी करण्यात आली. या आरोग्य तपासणीचा अनेक ग्रामस्थांनी लाभ घेतला.
कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी रिक्षा व्यावसायिक संघटना आंजणारीचे पदाधिकारी, जिल्हा परिषद शाळा आंजणारीचे शिक्षकवृंद तसेच आरोग्य विभागाच्या कर्मचाऱ्यांचे मोलाचे सहकार्य लाभले.
कार्यक्रमाचे नियोजन व सूत्रसंचालन उपकेंद्र वेरळचे एमपीडब्ल्यू सतीश कांबळे यांनी केले. यावेळी आझाद विचारे, प्रज्ञा कदम, साधना झोरे, सागर भांगे, विवेकानंद नाईक, विजयसिंग चव्हाण, राजेंद्र खुर्द, नमिता दीक्षित, रेणुका हनवते, विश्वजित काळे, मोतीलाल वाघ, नितीन चव्हाण, सुमेधा चव्हाण, अश्विनी चव्हाण, नंदिनी चव्हाण, मानवी पवार, प्रतीक्षा जाधव, अंजली चव्हाण यांच्यासह आरोग्य विभागाचे अधिकारी, कर्मचारी व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

