(जाकादेवी / वार्ताहर)
रत्नागिरी तालुक्यातील ओरी केंद्र शाळा क्रमांक १ मध्ये पदवीधर शिक्षकाची तातडीने नियुक्ती करण्यात यावी, अन्यथा विद्यार्थ्यांना शाळेत पाठविणार नसल्याचा इशारा पालकांनी दिला आहे. याबाबत शाळा व्यवस्थापन समिती आणि पालक संघाच्या वतीने गटशिक्षणाधिकारी, पंचायत समिती रत्नागिरी यांना निवेदन सादर करण्यात आले आहे.
ओरी केंद्र शाळा क्रमांक १ मध्ये इयत्ता पहिली ते सातवीपर्यंतचे वर्ग असून शाळेची एकूण पटसंख्या ४१ आहे. मात्र, या सात वर्गांसाठी केवळ दोन उपशिक्षक कार्यरत आहेत. त्यामुळे सर्व वर्गांना दर्जेदार अध्यापन देणे शक्य नसल्याने विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत असल्याची चिंता पालकांनी व्यक्त केली आहे.
या शाळेसाठी पदवीधर शिक्षकाचे पद मंजूर असतानाही ते दीर्घकाळापासून रिक्त आहे. रिक्त पद भरण्याबाबत वारंवार मागणी करूनही प्रशासनाकडून अद्याप कोणतीही कार्यवाही झालेली नसल्याचा आरोप पालकांनी केला आहे.
विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक हिताचा विचार करून शाळेत तात्काळ पदवीधर शिक्षकाची नियुक्ती करावी, अशी मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली आहे. तसेच येत्या दोन दिवसांत शिक्षकाची नियुक्ती न झाल्यास पालक आपल्या पाल्यांना शाळेत पाठविणार नाहीत, अशी ठाम भूमिका त्यांनी घेतल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले आहे.
यामुळे शिक्षण विभागाने या गंभीर प्रश्नाची तातडीने दखल घेऊन आवश्यक कार्यवाही करावी, अशी अपेक्षा पालक व ग्रामस्थांकडून व्यक्त होत आहे.

