(राजापूर)
मुंबई-गोवा महामार्गावर राजापूर तालुक्यातील ओणी येथे आज (मंगळवारी) दुपारी भीषण अपघात झाला. पेट्रोलपंपासमोर कार आणि दुचाकी यांच्यात झालेल्या जोरदार धडकेत दुचाकीस्वार जियाऊलक रफिक अन्सारी (वय २७, रा. झारखंड) याचा जागीच मृत्यू झाला.
मिळालेल्या माहितीनुसार, जियाऊलक अन्सारी हा दुचाकीवरून लांजाकडून राजापूरच्या दिशेने येत होता. यावेळी ओणी येथील पेट्रोलपंपातून अचानक महामार्गावर आलेल्या कारवर त्याची दुचाकी जोरात आदळली. धडक इतकी भीषण होती की अन्सारी यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली आणि त्यांचा जागीच मृत्यू झाला.
अपघाताची माहिती मिळताच स्थानिक नागरिकांनी घटनास्थळी धाव घेत मदतकार्य सुरू केले. जखमी अवस्थेत अन्सारी याला तत्काळ राजापूर ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले.
मृत जियाऊलक अन्सारी हा मूळचा झारखंड येथील रहिवासी असून राजापूर परिसरात एका बिल्डिंग कन्स्ट्रक्शन ठेकेदाराकडे काम करत होता, अशी माहिती समोर आली आहे.
घटनेची माहिती मिळताच राजापूर पोलीस स्थानकाचे प्रभारी पोलीस निरीक्षक रणदिवे, उपनिरीक्षक सुधीर उबाळे, मोबीन शेख, पोलीस कर्मचारी महेश जगताप आणि अन्य सहकाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला. तसेच ओणीचे पोलीस पाटील संजय लिंगायत, भाजपा युवा कार्यकर्ते समीर शिंदे, आयान वाघू, गणेश लाड आणि विजय सुवरे यांनीही मदतकार्य व वाहतूक नियंत्रणासाठी सहकार्य केले.
या प्रकरणी अपघाताची नोंद करण्यात आली असून मृतदेह शवविच्छेदनासाठी राजापूर ग्रामीण रुग्णालयात ठेवण्यात आला आहे. संबंधित ठेकेदारालाही घटनेची माहिती देण्यात आली असून पुढील तपास राजापूर पोलीस करत आहेत.

