(खेड)
खेड तालुक्यातील लोटे एमआयडीसी परिसरातील सामूहिक रासायनिक सांडपाणी प्रक्रिया प्रकल्प (सीईटीपी) ला भाजपा आमदार प्रमोद जठार यांनी भेट देऊन प्रत्यक्ष पाहणी केली. यानंतर आयोजित पत्रकार परिषदेत बोलताना त्यांनी प्रकल्पाच्या कार्यपद्धतीवर गंभीर प्रश्नचिन्ह उपस्थित करत प्रकल्प शासनाच्या ताब्यात घेण्याची मागणी केली.
लोटे एमआयडीसी परिसरात वाढत चाललेल्या प्रदूषणाबाबत चिंता व्यक्त करताना आमदार प्रमोद जठार म्हणाले की, नागरिकांच्या आरोग्याशी कोणतीही तडजोड सहन केली जाणार नाही. सीईटीपी प्रकल्पाचे व्यवस्थापन प्रभावीपणे होत नसल्याचा आरोप करत त्यांनी संबंधित यंत्रणांवर टीका केली.
या विषयावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तसेच पर्यावरण मंत्र्यांशी चर्चा करून ठोस निर्णयासाठी पाठपुरावा करणार असल्याचे त्यांनी सांगितले. लोटे परिसर प्रदूषणमुक्त करण्यासाठी भाजपच्या माध्यमातून सातत्याने आवाज उठवला जाईल, असा निर्धारही यावेळी व्यक्त करण्यात आला.
यावेळी भाजपा नेते तथा खेड नगर परिषदेचे माजी नगराध्यक्ष ॲड. वैभव खेडेकर, भाजपा उत्तर रत्नागिरी जिल्हाध्यक्ष सतीश मोरे, जिल्हा उपाध्यक्ष संजय आखाडे, भाजपा अल्पसंख्याक सेल रत्नागिरी जिल्हाध्यक्ष तथा नगरसेवक गटनेते रहीमभाई सहिबोल, भाजपा खेड तालुकाध्यक्ष ऋषिकेश मोरे, खेड शहराध्यक्ष भालचंद्र उर्फ नंदू साळवी, भाजपा युवा मोर्चा रत्नागिरी जिल्हा सरचिटणीस ॲड. मिलिंद उर्फ दादू नांदगांवकर, भाजपा जिल्हा कार्यकारिणी सदस्य निलेश बामणे, तालुका सरचिटणीस शुभम गायकवाड, स्वराज गांधी, प्रदीप भोसले, ओवैस चौगुले, पप्पू नीमनकर आदी उपस्थित होते.

