(राजापूर / तुषार पाचलकर)
पुढील उपचारासाठी ट्रॅव्हल्समधून मुंबईला जात असताना राजापूर तालुक्यातील रायपाटण येथे ७२ वर्षीय व्यक्तीचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. मधुकर गंगाराम कांबळे (वय ७२, रा. हेत, बौद्धवाडी, ता. वैभववाडी, जि. सिंधुदुर्ग) असे मृत व्यक्तीचे नाव आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, मधुकर कांबळे यांना काही काळापासून मधुमेह आजाराचा त्रास होता. ११ एप्रिल २०२६ रोजी दुपारी त्यांची प्रकृती अचानक बिघडल्याने त्यांना स्थानिक दवाखान्यात दाखल करण्यात आले. मात्र त्यांची तब्येत अधिक खालावल्याने डॉक्टरांनी त्यांना पुढील उपचारासाठी ओरोस किंवा मुंबई येथे घेऊन जाण्याचा सल्ला दिला. यावर तातडीचा निर्णय घेत कुटुंबीयांनी आपल्या हेत येथील घरी येऊन ट्रॅव्हल्स मधून मधुकर कांबळे यांना मुंबई येथे हलवण्याचे ठरवले.
दरम्यान, ट्रॅव्हल्समधून ११ रोजी दुपारी सुमारे ३:४५ वाजण्याच्या सुमारास जात रायपाटण येथे आले असताना कांबळे यांची प्रकृती अधिकच खालावली. श्वास घेण्यास त्रास वाढल्याने त्यांना तातडीने ग्रामीण रुग्णालय, रायपाटण येथे दाखल करण्याचा प्रयत्न करण्यात आला. मात्र, डॉक्टरांनी तपासणी करून त्यांना मृत घोषित केले.
मृत मधुकर कांबळे यांच्या पत्नी मनीषा कांबळे यांनी या घटनेची माहिती पोलिस स्थानकात दिली. या घटनेची नोंद राजापूर पोलीस ठाण्यात करण्यात आली असून, पोलीस सहाय्यक उपनिरीक्षक कमलाकर पाटील, पो. कॉ. स्वप्नील घाडगे, पो. कॉ. रामदास पाटील याबाबत अधिक तपास करत आहेत.

