( खेड )
उशिराने दाखल झालेल्या मान्सूनच्या पहिल्याच दमदार पावसाने मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गाच्या कामाची गुणवत्ता पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. खेड तालुक्यातील आवाशी येथे नव्याने तयार करण्यात आलेल्या रस्त्याचा काही भाग अचानक खचल्याने मालवाहू ट्रक पलटी होऊन अपघात झाला. या घटनेत सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नसली, तरी ट्रकचे मोठे नुकसान झाले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, खेडहून चिपळूणच्या दिशेने माल घेऊन जाणारा ट्रक आवाशी परिसरातून जात असताना अचानक रस्त्याचा भाग खचला. रस्त्याने वजन न पेलल्याने ट्रकचा तोल जाऊन तो एका बाजूला पलटी झाला.
मुंबई-गोवा महामार्गावरील आवाशी परिसरात रस्त्याचे काम अद्याप सुरू असून, पावसाळा सुरू होऊनही अनेक ठिकाणी काम अपूर्ण आहे. त्यामुळे वाहनचालकांमध्ये आधीपासूनच सुरक्षिततेबाबत चिंता व्यक्त केली जात होती. पहिल्याच जोरदार पावसानंतर रस्ता खचल्याने या चिंतेला अधिक बळ मिळाले आहे.
अपघाताच्या वेळी चालकाने प्रसंगावधान राखल्यामुळे मोठी दुर्घटना टळली. तसेच त्या वेळी परिसरात अन्य वाहने नसल्याने साखळी अपघाताचा धोका टळला. मात्र या घटनेमुळे काही काळ वाहतुकीवर परिणाम झाला.
पहिल्याच पावसात रस्ता खचल्याच्या घटनेमुळे महामार्गाच्या कामाच्या दर्जाबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले असून, संबंधित यंत्रणा आणि कंत्राटदारांच्या कामकाजावर स्थानिक नागरिकांकडून नाराजी व्यक्त केली जात आहे. या घटनेची चौकशी करून दोषींवर कारवाई करावी आणि पावसाळ्यात महामार्गावरील अपूर्ण व धोकादायक ठिकाणी तातडीने दुरुस्ती करावी, अशी मागणी वाहनचालक आणि नागरिकांकडून केली जात आहे.

