(मुंबई)
राज्याच्या अन्न व औषध प्रशासन (FDA) विभागाची धुरा स्वीकारल्यानंतर तुकाराम मुंढे यांनी भेसळयुक्त, बनावट आणि दिशाभूल करणाऱ्या उत्पादनांविरोधात राज्यव्यापी मोहीम उघडली असून, एफडीएच्या धडक कारवाईमुळे नियमबाह्य व्यवसाय करणाऱ्यांमध्ये खळबळ उडाली आहे. मुंबई, कराड आणि लातूरसह विविध भागांत टाकण्यात आलेल्या धाडीत लाखो रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
मुंबईतील क्रॉफर्ड मार्केट परिसरातील सौंदर्यप्रसाधनांच्या दुकानावर शनिवारी एफडीएच्या पथकाने छापा टाकून स्तनांचा आकार वाढवणे, नितंब अधिक सुडौल करणे आणि शरीरातील चरबी झपाट्याने कमी करणे अशा भ्रामक दावे करणाऱ्या उत्पादनांचा मोठा साठा जप्त केला. ‘ब्रेस्ट एन्लार्ज’, ‘बट एन्हान्समेंट’ आणि ‘फॅट बर्नर’ या नावाखाली विक्रीस ठेवलेल्या उत्पादनांवर बॅच क्रमांक, उत्पादन परवाना, उत्पादक कंपनीची माहिती यांसारखे आवश्यक तपशील नसल्याचे तपासात आढळून आले. तसेच उपचारात्मक आणि सौंदर्यवर्धक गुणधर्मांचा दावा करणाऱ्या तेलाचाही साठा जप्त करण्यात आला. या कारवाईत सुमारे १.०२ लाख रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला.
दरम्यान, मुंबईतील कांदिवली परिसरातही एफडीएच्या पथकाने धाड टाकत वैध परवान्याविना सुरू असलेल्या सौंदर्यप्रसाधने आणि औषधनिर्मितीच्या कारखान्यावर कारवाई केली. या ठिकाणाहून औषधे, सौंदर्यप्रसाधने, कच्चा माल आणि उत्पादनासाठी वापरली जाणारी यंत्रसामग्री असा जवळपास ३.९७ लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. सातारा जिल्ह्यातील कराड येथेही एफडीएने मोठी कारवाई करत तब्बल २९.४५ लाख रुपयांची सौंदर्यप्रसाधने आणि संबंधित साहित्य जप्त केले. जप्त करण्यात आलेल्या उत्पादनांवर बॅच क्रमांक, उत्पादन दिनांक, लेबलिंग आणि अन्य आवश्यक माहिती नमूद नसल्याचे निदर्शनास आले. त्यामुळे संबंधित उत्पादनांच्या वैधतेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. याच मोहिमेअंतर्गत लातूर शहरातील खवा विक्री करणाऱ्या सात ते आठ दुकानांचीही अन्न व औषध प्रशासनाच्या विशेष पथकाने तपासणी केली. खाद्यपदार्थांची गुणवत्ता, कागदपत्रे आणि नियमांचे पालन यांची पडताळणी करण्यात आली. या तपासणीत कोणताही भेसळयुक्त अथवा संशयास्पद माल आढळून न आल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे.
राज्यात भेसळयुक्त अन्नपदार्थ, बनावट औषधे, गुटखा आणि तंबाखूजन्य पदार्थांविरोधात अन्न व औषध प्रशासनाने सुरू केलेल्या या व्यापक मोहिमेमुळे नियमभंग करणाऱ्यांवर मोठा दबाव निर्माण झाला आहे. आगामी काळातही अशा कारवाया अधिक तीव्र करण्यात येणार असल्याचे संकेत प्रशासनाकडून देण्यात येत आहेत.

