(संगमेश्वर / प्रतिनिधी)
परचुरी ते फुंणगूस खाडी समांतर रस्त्यावरील तुंबलेली गटारे आणि रस्त्यालगत वाढलेल्या झाडीमुळे वाहतुकीस गंभीर अडथळे निर्माण होत असून अपघाताचा धोका वाढल्याचा मुद्दा माहिती अधिकार कार्यकर्ते सुभाष लांजेकर यांनी ऐरणीवर आणला आहे. यासंदर्भात त्यांनी ग्रामीण रस्ते विभागाकडे लेखी निवेदन सादर करून तातडीने उपाययोजना करण्याची मागणी केली आहे.
लांजेकर यांनी दिलेल्या निवेदनानुसार, संबंधित रस्त्यावर कंत्राटदारामार्फत पावसाच्या पाण्याचा निचरा व्हावा यासाठी गटारांची उभारणी करण्यात आली होती. मात्र, पावसाळ्यात दरडी कोसळून दगड गटारात साचल्याने अनेक ठिकाणी गटारे पूर्णपणे तुंबली आहेत. परिणामी पावसाच्या पाण्याचा निचरा सुरळीत होत नसून पाणी थेट रस्त्यावरून वाहत आहे. त्यामुळे रस्त्याचे नुकसान होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. याशिवाय रस्त्यालगत मोठ्या प्रमाणात वाढलेल्या झाडीमुळे समोरून येणारी वाहने वेळेवर दिसत नसल्याने वाहनचालकांना कसरत करावी लागत आहे. विशेषतः वळणाच्या ठिकाणी दृश्यमानता कमी झाल्याने अपघाताचा धोका अधिक वाढल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले आहे.
या पार्श्वभूमीवर संबंधित कंत्राटदाराला तातडीने निर्देश देऊन गटारांमधील दगड व माती हटवून साफसफाई करावी, तसेच रस्त्यालगतची वाढलेली झाडी त्वरित कापून वाहतूक सुरक्षित करण्यासाठी आवश्यक कार्यवाही करण्यात यावी, अशी मागणी सुभाष लांजेकर यांनी ग्रामीण रस्ते विभागाकडे केली आहे.

