(गणपतीपुळे / वैभव पवार)
रत्नागिरी तालुक्यातील मालगुंड बाजारपेठेतील बळीराम परकर विद्यालयासमोरील मुख्य रस्त्यावर मोठ्या प्रमाणात खडी पसरल्याने वाहनधारकांसाठी धोके निर्माण झाले आहेत. विशेषतः दुचाकी वाहने घसरून अपघात होत असल्याची माहिती स्थानिक ग्रामस्थ आणि परिसरातील व्यावसायिकांनी दिली आहे.
मालगुंड बाजारपेठ ते वरवडे गावाला जोडणारा हा मुख्य रस्ता वाहतुकीच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचा मानला जातो. या मार्गावरून दररोज लहान-मोठ्या वाहनांची तसेच पादचाऱ्यांची मोठ्या प्रमाणात वर्दळ असते. याच रस्त्यालगत मालगुंडमधील नामांकित बळीराम परकर विद्यालय आणि ज्युनिअर कॉलेज असल्याने विद्यार्थीही मोठ्या संख्येने या मार्गाचा वापर करतात.
रस्त्यावर पसरलेल्या बारीक आणि मोठ्या खडीमुळे दुचाकी वाहने घसरून अपघात होण्याचे प्रमाण वाढत असल्याचा आरोप स्थानिकांकडून करण्यात येत आहे. विशेषतः शालेय विद्यार्थी आणि ज्येष्ठ नागरिकांसाठी हा रस्ता अधिक धोकादायक बनला असल्याचे मत व्यक्त होत आहे.
सदर रस्ता जिल्हा परिषद बांधकाम विभागाच्या अखत्यारीत येत असल्याने संबंधित विभागाने तातडीने या समस्येकडे लक्ष देण्याची मागणी होत आहे. तसेच मालगुंड ग्रामपंचायतीनेही संबंधित खात्याशी पाठपुरावा करून रस्त्यावर साचलेली खडी हटवून वाहतूक सुरळीत करण्यासाठी आवश्यक उपाययोजना कराव्यात, अशी मागणी स्थानिक ग्रामस्थांकडून करण्यात येत आहे.

