(राजापूर / तुषार पाचलकर)
समृद्ध कोंकण आणि जागृत सेवा मंडळ रायपाटण यांच्या संयुक्त विद्यमाने ग्रामविकासाच्या क्षेत्रात आदर्श ठरलेल्या हिवरे बाजारचे सरपंच पद्मश्री पोपटराव पवार यांच्या कार्याचा अभ्यास करण्यासाठी विशेष अभ्यास दौरा आयोजित करण्यात येणार आहे. याबाबतची माहिती समृद्ध कोंकणचे अध्यक्ष संतोष गांगण यांनी दिली.
रायपाटण येथे नुकतेच पद्मश्री पोपटराव पवार यांचे “यशोगाथा ग्रामविकासाची” हे प्रेरणादायी व्याख्यान आयोजित करण्यात आले होते. या कार्यक्रमाला ग्रामविकासासाठी कार्य करणारे ग्रामस्थ, तरुणाई, सामाजिक कार्यकर्ते आणि स्थानिक स्वराज्य संस्थांचे प्रतिनिधी मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाच्या निमित्ताने ग्रामीण विकासासाठी विशेष कार्य करणाऱ्या ग्रामविकास शिलेदारांचा सन्मान सोहळाही पार पडला.
यावेळी उपस्थित सरपंच आणि ग्रामविकासासाठी कार्यरत प्रतिनिधींना हिवरे बाजारला प्रत्यक्ष भेट देऊन तेथील विकास मॉडेलचा अभ्यास करण्यासाठी एकत्रित अभ्यास दौरा आयोजित करण्याचे आश्वासन देण्यात आले होते. त्यानुसार लवकरच हा दौरा आयोजित करण्यात येणार आहे.
महाराष्ट्रातील आदर्श गाव म्हणून ओळखल्या जाणाऱ्या हिवरे बाजार गावाच्या विकासामागे पद्मश्री पोपटराव पवार यांचे नेतृत्व महत्त्वाचे मानले जाते. जलसंधारण, लोकसहभाग, ग्रामशासनातील पारदर्शकता आणि शाश्वत विकास या संकल्पनांच्या प्रभावी अंमलबजावणीमुळे हिवरे बाजारचा विकास देशभरात आदर्श ठरला आहे. त्यांच्या उल्लेखनीय कार्याची दखल घेत भारत सरकारने सन २०२० मध्ये त्यांना पद्मश्री पुरस्काराने गौरविले आहे.
या अभ्यास दौऱ्यात सहभागी होणाऱ्यांना हिवरे बाजारमध्ये राबविण्यात आलेले विविध विकास प्रकल्प, ग्रामविकासासाठीची लोकसहभागाची संकल्पना आणि ग्रामीण भागात साधलेला शाश्वत विकास प्रत्यक्ष पाहण्याची संधी मिळणार आहे.
हा अभ्यास दौरा ग्रामीण विकासाला नवी दिशा देणारा आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या प्रतिनिधींसाठी प्रेरणादायी ठरणार असल्याचे संतोष गांगण यांनी सांगितले. राजापूर तालुक्यातील सर्व सरपंच तसेच अन्य स्थानिक स्वराज्य संस्थांच्या लोकप्रतिनिधींनी या अभ्यास दौऱ्याचा लाभ घ्यावा, असे आवाहन आयोजकांच्या वतीने करण्यात आले आहे. दौऱ्याबाबतची सविस्तर माहिती आणि सहभाग नोंदणीसाठी संबंधितांशी लवकरच संपर्क साधण्यात येणार आहे.

