(रत्नागिरी)
बृहनमुंबई विज्ञान शिक्षक संघटनेतर्फे आयोजित ‘डॉक्टर होमी भाभा बालवैज्ञानिक स्पर्धा 2025–26’ मध्ये रत्नागिरीच्या फाटक हायस्कूलमधील इयत्ता सहावीची विद्यार्थिनी कु. स्पृहा तेजराज भावे हिने सुवर्णपदक पटकावत जिल्ह्याचा मान उंचावला आहे. विशेष म्हणजे, रत्नागिरी जिल्ह्यातून सुवर्णपदक मिळवणारी ती एकमेव विद्यार्थिनी ठरली आहे.
गेल्या सुमारे 45 वर्षांपासून ही मानांकित स्पर्धा विद्यार्थ्यांमध्ये वैज्ञानिक दृष्टिकोन आणि संशोधनाची आवड निर्माण करण्यासाठी घेतली जाते. इयत्ता सहावी व नववीच्या विद्यार्थ्यांसाठी होणाऱ्या या स्पर्धेत देशभरातून लाखो विद्यार्थी सहभागी होतात. विद्यार्थ्यांच्या बायोडेटाद्वारे त्यांच्या व्यक्तिमत्त्वाच्या विविध पैलूंचाही अभ्यास केला जातो.
या स्पर्धेचे चार टप्पे असतात—लेखी परीक्षा, प्रात्यक्षिक, कृती संशोधन अहवाल आणि मुलाखत. यंदाच्या स्पर्धेची थीम ‘पृथ्वी प्रणाली आणि मानवी हस्तक्षेप’ अशी होती. कोल्हापूर विभागातून घेतलेल्या लेखी परीक्षेनंतर निवड झालेल्या विद्यार्थ्यांची प्रात्यक्षिक परीक्षा झाली. त्यामध्ये रत्नागिरी जिल्ह्यातील चार विद्यार्थी उत्तीर्ण झाले, त्यापैकी फाटक हायस्कूलची स्पृहा भावे ही एकमेव विद्यार्थिनी पुढील फेरीसाठी पात्र ठरली.
पुढील टप्प्यात विद्यार्थ्यांना दिलेल्या विषयावर स्वतंत्रपणे संशोधन करून प्रकल्प अहवाल सादर करावा लागतो. स्पृहाने “शाश्वत शेती—आंब्याची दिशा, कोकणच्या विकासाची” या विषयावर प्रकल्प सादर केला. या प्रकल्पात तिने कोकणातील आंबा पिकाची सध्यस्थिती, रासायनिक खतांचे दुष्परिणाम, घटते उत्पादन आणि सेंद्रिय शेतीचे फायदे यांचा सखोल अभ्यास मांडला.
या प्रकल्पासाठी तिला विविध तज्ज्ञांचे मार्गदर्शन लाभले. त्यामध्ये डॉ. स्वप्नजा मोहिते, नारळ संशोधन केंद्राचे डॉ. मालशे, कीटकशास्त्रज्ञ डॉ. वानखेडे, कृषी अधिकारी श्री. हेगडे, तंत्रज्ञ श्री. काळे, प्रा. मंगल पटवर्धन, डॉ. संजय केतकर तसेच आंबा बागायतदार आणि इतर मान्यवरांचा समावेश होता. फाटक हायस्कूलचे शिक्षक व संस्थाचालकांचेही तिला मोलाचे सहकार्य लाभले.
अंतिम फेरीतील मुलाखतीनंतर मुंबई येथे रविवारी (दि. 5 एप्रिल 2026) झालेल्या पुरस्कार वितरण समारंभात स्पृहाला सुवर्णपदक प्रदान करण्यात आले. हा पुरस्कार संरक्षण मंत्रालयातील निवृत्त डीआरडीओ सहसंचालक डॉ. ए. जी. नगरकर यांच्या हस्ते देण्यात आला.
स्पृहाच्या या उल्लेखनीय यशाबद्दल सर्व स्तरांतून तिचे कौतुक होत असून, रत्नागिरी जिल्ह्यासाठी हा अभिमानाचा क्षण असल्याची प्रतिक्रिया शिक्षण क्षेत्रातून व्यक्त होत आहे.

