(रत्नागिरी)
आजपर्यंत आदिवासी समाजाच्या व्यक्तींनी मोठे योगदान दिले आहे. भारताच्या राष्ट्रपतीही आदिवासी समाजाच्या आहेत. अन्यही सर्वोच्च पदावर जाण्याची या समाजाला संधी आहे. पण त्यासाठी शिकण्याची, अभ्यास करण्याची व कठोर परिश्रमांची गरज आहे. स्वप्न मोठं ठेवा व पुढे जा, कर्तृत्व दाखवा असे आवाहन जिल्हा विधी सेवा प्राधिकरणचे सचिव, न्यायाधीश आर. आर. पाटील यांनी केले.
ऑर्गनायझेशन फॉर राइट्स ऑफ ट्रायबलच्या जिल्हा शाखेच्या वतीने प्रथमच जागतिक आदिवासी गौरव दिवस साजरा करण्यात आला. त्यावेळी ते ते बोलत होते. साळवी स्टॉप येथील माध्यमिक शाळा सेवक सहकारी पतपेढीच्या सभागृहात हा कार्यक्रम झाला. सकाळी मारुती मंदिर ते साळवी स्टॉप या मार्गावर रॅली काढण्यात आली.
मंचावर कार्यक्रमाचे अध्यक्ष व ऑफ्रोट संघटनेचे रत्नागिरी जिल्हाध्यक्ष प्रा. सुनील जोपळे, स्वागताध्यक्ष तथा ऑफ्रोट संघटनेचे कार्याध्यक्ष लुकमान तडवी, रत्नागिरी जिल्हा वकील संघटनेचे उपाध्यक्ष अॅड. निनाद शिंदे, माध्यमिक पतपेढीचे अध्यक्ष सागर पाटील, प्राथमिक शिक्षक पतपेढीचे अध्यक्ष संतोष कांबळे, सौ. मेहराज तडवी आदी उपस्थित होते.
न्यायाधीश आर. आर. पाटील यांनी समाजातील वंचित, उपेक्षितांना न्याय मिळण्यासाठी कायद्यातील तरतुदी व आदिवासांसाठीच्या विविध योजनांची माहिती दिली. जिल्हा विधी सेवा प्राधिकरण म्हणजे काय, प्रत्येकाला न्याय मिळाला पाहिजे, असा हक्क राज्यघटनेने दिला असल्याची माहिती दिली. सामाजिक, आर्थिक न्याय संधी समानता याबाबत छत्रपती शाहू महाराज, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची उदाहरणे देऊन माहिती दिली. स्वातंत्र्याच्या ७५ वर्षानंतरही अजूनही लोक उपेक्षित आहेत, शासकीय योजनांपासून प्रचंड दूर आहेत. त्यांना मदत व जनजागृती करण्याचे काम विधी सेवा प्राधिकरण करते. राष्ट्रीय विधी सेवा प्राधिकरणने २०१५ मध्ये ट्रायबल संवाद ही योजना आणली असून त्याचा लाभ अनेकांना मिळत आहे.
अध्यक्षीय भाषणात प्रा. सुनील जोपळे यांनी सांगितले, जिल्ह्यात प्रथमच असा कार्यक्रम आयोजित केला असून आपल्या आदिवासींच्या हक्कांसाठी, अधिकारी, कर्मचाऱ्यांसाठी कायमच पाठपुरावा करणार आहे. परंतु काही वेळा आदिवासी समाजातीलच काही लोक बदनाम करण्याचा प्रयत्न करतात. परंतु आजचा कार्यक्रम यशस्वी करून दाखवला आहे. लुकमान तडवी यांनी प्रास्ताविक केले. निबंध कानिटकर यांनी सूत्रसंचालन केले. प्रविण भोये याने आभार मानले.
आदिवासी भवन उभारणार
राज्याचे उद्योगमंत्री, तथा जिल्ह्याचे पालकमंत्री उदय सामंत यांनी आदिवासी भवनाकरिता जागा देण्याचे आश्वासन दिले आहे. तसेच लांजा-राजापूरचे आमदार किरण सामंत यांनीदेखील मदतीची ग्वाही दिली आहे. त्यानुसार पुढील ५ वर्षांत आदिवासी भवन उभारून राज्यातील आदिवासींच्या ४५ जाती-जमातींना बोलावू. सर्वांच्या सहकार्याने हे भवन दिमाखदार होईल, असा विश्वास सुनील जोपळे यांनी याप्रसंगी व्यक्त केला.