(संगमेश्वर / एजाज पटेल)
हिंदू संस्कृतीत प्रत्येक घटकाला स्थान देण्यात आले आहे. अनंत चतुर्थीनंतर येणाऱ्या पितृपंधरवड्यातही पक्षाच्या रूपात निसर्ग सामावला आहे. या पंधरवड्यात पिंडाला शिवण्यासाठी कावळे आवश्यक असतात. परंतु ते कावळे आता दुर्मिळ झाल्यामुळे पिंडदान करणाऱ्यांना कावळ्याची तासन्तास प्रतीक्षा करावी लागते. कावळे दुर्मिळ होण्यामागे पर्यावरणाचा असमतोल कारणीभूत आहे असेच म्हणावे लागेल.
यावर्षी मंगळवार 17 सप्टेंबर पासून पितृ पंधरवड्याला सुरुवात झाली. 2 ऑक्टोबरला सर्वपित्र अमावस्या आहे. या पंधरवड्यात दिवंगत आप्तांचे स्मरण म्हणून श्राद्ध घातले जाते. या विधीदरम्यान पिंडदान करतात. त्यावेळी काकस्पर्श महत्त्वाचा असतो. मात्र अलीकडे निसर्गाचा समतोल ढासळल्याने हा काकस्पर्श दुर्मिळ झाला आहे.
शहरी भागासह ग्रामीण भागातही सारखीच परिस्थती आहे. सप्टेंबर, ऑक्टोबर दरम्यान शेतातील पीक तयार होते. त्यामुळे पक्ष्यांना मोठ्या प्रमाणात त्या ठिकाणी खाद्य उपलब्ध असते. मात्र अलीकडे शेतीच कमी होऊन ग्रामीण भागातील शेती ओसाड पडली आहे. तर दुसरीकडे मोठ्या प्रमाणात जंगलतोड होत आहे, तसेच प्रदूषण मध्येही वाढ होत आहे. त्यातही यावर्षी पाऊस उशिरा आल्याने सर्रास कुठेही आणि कधीही आढळणारा कावळा आता दिसेनासा होऊ लागला आहे. याचा अनुभव आता पितृपंधरवड्यात प्रकर्षाने जाणवू लागला आहे.
कावळा पर्यावरण रक्षणाचे काम करतो. तो एकप्रकारे स्वच्छतादूतच आहे. परिसरात पडलेले सडके मांस, मृत प्राणी, किडे आदींचे भक्षण करून तो आपले जीवन जगतो. पिंडाला कावळा शिवला म्हणजे कार्य पार पडले असा आपला समज असतो. त्याचप्रमाणे मृत व्यक्तीच्या दसपिंड विधीतही काकस्पर्श महत्त्वाचा मानला आहे. त्यामुळे हिंदू संस्कृतीत पौराणिक सांगड घालून कावळ्याचे महत्त्व पटविण्यात आले, मात्र अलीकडे तोच कावळा नजरेआड होऊ लागला आहे.
पितृपक्षाचे महत्त्व
पितृपक्षात स्नान आणि दानाला विशेष महत्त्व आहे. त्यामुळे एखाद्या पवित्र ठिकाणी जाण्याची संधी न मिळाल्यास घरातच गंगाजल पाण्यात मिसळून स्नान करावे. तसेच पितृपक्ष काळात गरजूंना अन्न, पैसे किंवा कपडे दान करावे. पितृपक्षात पशु- पक्ष्यांची सेवा केल्यानेही विशेष लाभ होतो. त्यामुळे पितृपक्षाच्या काळात कावळे, गाय, कुत्रे आदींना घरगुती अन्नाचा काही भाग जरूर द्यावा. असे केल्याने पितर प्रसन्न होते, असे मानले जाते.