(संगमेश्वर / प्रतिनिधी)
नवरात्रोत्सवाचे औचित्य साधून भडगाव खोंडे येथील न्यू आयडियल रेसिडेन्सीमध्ये रहिवाशांच्या वतीने विविध सांस्कृतिक आणि मनोरंजनात्मक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले. दांडिया, पारंपरिक लेझिम नृत्य आणि महिलांसाठी आयोजित ‘होम मिनिस्टर’ या विशेष खेळांमुळे संपूर्ण परिसरात उत्साहाचे वातावरण निर्माण झाले.
कार्यक्रमाची सुरुवात पारंपरिक आरतीने झाली. त्यानंतर रंगीबेरंगी पोशाख परिधान केलेल्या लहान मुलांपासून ज्येष्ठांपर्यंत सर्वांनीच गरबा आणि दांडियाच्या तालावर ठेका धरत उत्सवाचा आनंद लुटला. यानंतर तरुणाई आणि महिलांनी सादर केलेल्या शिस्तबद्ध लेझिम नृत्याने उपस्थितांचे लक्ष वेधून घेतले. ढोल-ताशांच्या गजरात सादर झालेल्या या नृत्यामुळे कार्यक्रमात विशेष रंगत आली.
कार्यक्रमाच्या उत्तरार्धात महिलांसाठी आयोजित करण्यात आलेल्या ‘होम मिनिस्टर’ या मनोरंजक खेळाने सोहळ्याची रंगत आणखी वाढवली. विविध मजेशीर खेळ, उखाणे आणि स्पर्धेतील चुरशीच्या सहभागामुळे उपस्थितांमध्ये उत्साह संचारला. स्पर्धेत उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या विजेत्यांना आकर्षक पैठणी आणि मानाची बक्षिसे देऊन सन्मानित करण्यात आले.
हा नवरात्रोत्सव सोहळा यशस्वी करण्यासाठी आयडियल परिवारातील सर्व कमिटी सदस्य, युवा वर्ग आणि महिला मंडळाच्या सदस्यांनी विशेष मेहनत घेतली. रहिवाशांचा उत्स्फूर्त सहभाग आणि सर्वांच्या सहकार्यामुळे न्यू आयडियल रेसिडेन्सीतील हा सांस्कृतिक सोहळा आनंदी वातावरणात आणि मोठ्या उत्साहात पार पडला.


