(चिपळूण)
तालुक्यातील खेर्डी-दत्तवाडी परिसरात महिलांसाठी खास ‘खेळ पैठणीचा, सन्मान नारी शक्तीचा’ या भव्य कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. युवा उद्योजक व दत्तवाडी मित्र मंडळाचे आधारस्तंभ अजिंक्यदादा पवार यांच्या पुढाकाराने रविवार, दि. १० मे रोजी सायंकाळी ७ वाजता खेर्डी दत्तवाडी येथील कलावती आई मंदिराशेजारील पल्लोड मैदान येथे हा कार्यक्रम रंगणार आहे.
कार्यक्रमात ‘होम मिनिस्टर – खेळ पैठणीचा’ हा लोकप्रिय खेळ सादर करण्यात येणार असून महिलांसाठी विविध मनोरंजक उपक्रमांची रेलचेल असणार आहे. दिग्दर्शक संतोष ताम्हाणे प्रस्तुत या कार्यक्रमाचे सूत्रसंचालनही आकर्षक पद्धतीने पार पडणार आहे. विजेत्या महिलांना आकर्षक पैठणी साड्यांचे बक्षीस देण्यात येणार आहे.
या सोहळ्याला प्रसिद्ध अभिनेत्री जान्हवी किल्लेकर प्रमुख पाहुणी म्हणून उपस्थित राहणार असून त्यांच्या उपस्थितीमुळे कार्यक्रमाची रंगत अधिक वाढणार आहे. याशिवाय सहभागी महिलांसाठी लकी ड्रॉचेही आयोजन करण्यात आले आहे. यामध्ये बंपर बक्षीस म्हणून दुचाकी, प्रथम क्रमांकासाठी फ्रिज, द्वितीय क्रमांकासाठी एअर कूलर, तृतीय क्रमांकासाठी मिक्सर तर चतुर्थ क्रमांकासाठी प्रेशर कुकर अशी आकर्षक बक्षिसे ठेवण्यात आली आहेत.
महिलांच्या सन्मानासोबतच त्यांचे मनोरंजन व्हावे, या उद्देशाने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले असून खेर्डी व परिसरातील महिलांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून कार्यक्रमाची शोभा वाढवावी, असे आवाहन आयोजक अजिंक्यदादा पवार यांनी केले आहे. कार्यक्रमाच्या पार्श्वभूमीवर परिसरात उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे.

