(खेड/ रत्नागिरी)
मान्सूनच्या प्रतीक्षेत असलेल्या कोकणात अद्यापही पावसाने अपेक्षित हजेरी न लावल्याने पाणीटंचाईचे संकट दिवसेंदिवस गडद होत आहे. खेड तालुक्यातील लोटे परशुराम औद्योगिक वसाहत आणि एमआयडीसीच्या पाणीपुरवठ्यावर अवलंबून असलेली पंचक्रोशी सध्या तीव्र जलसंकटाचा सामना करत आहे. मागील चार दिवसांपासून पाणीपुरवठा विस्कळीत झाल्याने औद्योगिक उत्पादनावर गंभीर परिणाम झाला असून अनेक कंपन्यांतील उत्पादन प्रक्रिया अक्षरशः ठप्प झाली आहे.
कोयना जलविद्युत प्रकल्पातील जलसाठा कमी झाल्यामुळे वीज निर्मितीवर मर्यादा आल्या आहेत. त्यातच पावसाने दडी मारल्याने चिपळूणमधील वाशिष्ठी नदीत होणारा पाण्याचा विसर्गही बंद झाला आहे. परिणामी नदीपात्र कोरडे पडण्याच्या स्थितीत पोहोचले असून त्याचा थेट फटका चिपळूण शहर, लोटे परशुराम औद्योगिक वसाहत, कामगार वसाहती आणि परिसरातील गावांना बसत आहे. वालोपे येथील पाणीपुरवठा योजनेतून वाशिष्ठी नदीच्या पाण्यावर आधारित पुरवठा केला जातो. मात्र नदीतील उपलब्ध पाणीसाठा संपुष्टात आल्याने मागील चार दिवसांपासून लोटे औद्योगिक वसाहतीकडे होणारा पाणीपुरवठा पूर्णपणे बंद झाला आहे. त्यामुळे औद्योगिक क्षेत्रात चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे.
लोटे परशुराम औद्योगिक वसाहतीतील बहुतांश उद्योग रासायनिक उत्पादनाशी संबंधित असल्याने उत्पादन प्रक्रियेसाठी मोठ्या प्रमाणात पाण्याची आवश्यकता असते. पाण्याअभावी अनेक कंपन्यांचे सुमारे ९० टक्के उत्पादन प्रकल्प बंद पडल्याची माहिती समोर आली आहे. उत्पादन थांबल्याने आर्थिक नुकसान वाढत असून उद्योग व्यवस्थापनासमोर मोठे आव्हान उभे ठाकले आहे. किमान कामगारांच्या पिण्याच्या पाण्याची गरज भागावी, अशी आर्त मागणी उद्योजकांकडून केली जात आहे.
पावसाचे आगमन आणखी काही दिवस लांबल्यास परिस्थिती अधिक गंभीर होण्याची भीती व्यक्त केली जात आहे. उद्योगांचे उर्वरित प्रकल्पही बंद करण्याची वेळ येऊ शकते, अशी चिंता औद्योगिक वर्तुळातून व्यक्त होत आहे.
दरम्यान, जलटंचाईचा फटका ग्रामीण भागालाही बसू लागला आहे. आवाशी, लोटे, घाणेखुंट, पीरलोटे, सोनगाव, धामणदिवी यांसह परिसरातील अनेक गावांमध्ये पिण्याच्या पाण्यासाठी नागरिकांची भटकंती वाढली आहे. परिस्थितीची तीव्रता लक्षात घेऊन काही ग्रामपंचायतींनी टँकरद्वारे पाणीपुरवठा करण्यासाठी प्रयत्न सुरू केले आहेत. मात्र, पावसाच्या आगमनाशिवाय या संकटातून दिलासा मिळणे कठीण असल्याचे चित्र सध्या दिसून येत आहे.

