(देवळे / प्रकाश चाळके)
संगमेश्वर तालुक्यातील कोंडगाव-दळवीवाडी येथील कु. ऋचा मनोज चव्हाण हिने एमबीबीएस परीक्षेत उल्लेखनीय यश संपादन करत वैद्यकीय पदवी प्राप्त केली आहे. तिच्या या यशामुळे कोंडगाव-साखरपा परिसरात आनंदाचे वातावरण असून तिच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.
सध्या ऋचा शिक्षणासाठी ठाणे येथील किसननगर परिसरात वास्तव्यास आहे. महाराष्ट्र युनिव्हर्सिटी ऑफ हेल्थ सायन्सेस अंतर्गत पालघर येथील वेदांता इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्स कॉलेजमधून तिने एमबीबीएस पदवी पूर्ण केली.
लहानपणापासूनच वैद्यकीय क्षेत्रात करिअर करण्याचे स्वप्न उराशी बाळगलेल्या ऋचाने जिद्द, चिकाटी आणि कठोर परिश्रमाच्या जोरावर हे यश मिळवले. आई-वडिलांचे पाठबळ आणि गावकऱ्यांचे प्रेम व आशीर्वाद यामुळेच हे यश शक्य झाल्याची भावना तिने व्यक्त केली.
दूरध्वनीद्वारे संपर्क साधला असता ऋचाने सांगितले की, “डॉक्टर हे परमेश्वराचे दुसरे रूप मानले जाते. भविष्यात एमडीचे शिक्षण पूर्ण करून जिथे असेन तिथे रुग्णांची प्रामाणिकपणे सेवा करणार आहे. वैद्यकीय क्षेत्र हे केवळ पैसा कमावण्याचे साधन नसून रुग्णांना नवसंजीवनी देण्याची मोठी जबाबदारी आहे.”
तिच्या या यशाबद्दल कोंडगाव, साखरपा तसेच परिसरातील नागरिकांकडून तिचे विशेष कौतुक करण्यात येत आहे.

