(गणपतीपुळे / वैभव पवार)
रत्नागिरी तालुक्यातील मालगुंड येथील मुख्य बाजारपेठेपासून धावडेवाडीकडे जाणारा रहदारीचा रस्ता हा तीव्र चढउताराचा आहे. या रस्त्याच्या तीव्र उताराच्या भागात मोठ्या प्रमाणात खड्डे पडले होते. तसेच अवकाळी पावसामुळे या रस्त्यावर खडीचे थर साचले होते. त्यामुळे याच रस्त्यावर गेल्या काही दिवसांपूर्वी धावडेवाडी परिसरातील एक दुचाकीस्वार घसरुन पडल्यामुळे त्याच्या हाताला किरकोळ मार लागला होता. या कारणाने हा रस्ता एखाद्या मोठ्या अपघाताला कारणीभूत ठरल्याचे चित्र दिसून येत होते. याच रस्त्यावरून धावडेवाडीतील लहानथोर व्यक्ती नियमित ये जा करीत असतात. तसेच मालगुंड बाजारपेठेतून धावडेवाडीकडे जाणारी लहान मोठी वाहने यांची वर्दळ या रस्त्यावरून सुरू असते.
एकूणच धावडेवाडी येथील ग्रामस्थांसाठी हा रस्ता रहदारी आणि वाहतुकीसाठी अत्यंत सोयीस्कर आणि महत्त्वाचा ठरला आहे. परंतु या रस्त्याची दुर्दशा झालेली असताना डागडुजी करण्याचे काम खरे तर संबंधित बांधकाम प्रशासनाने केले पाहिजे होते. तसेच मालगुंड ग्रामपंचायत किंवा मालगुंड येथील स्थानिक लोकप्रतिनिधींनी या रस्त्याच्या दुदर्शेकडे कटाक्षाने व गांभीर्याने लक्ष देण्याची गरज होती. मात्र कुणीही या रस्त्याच्या दुरावस्तेकडे लक्ष न दिल्याने अखेर हे काम सामाजिक बांधिलकीतून मालगुंड बाजारपेठ येथील रिक्षा संघटनेने करून या रस्त्याची पूर्णतः डागडुजी केली आहे.
या रस्त्यावर रिक्षा संघटनेने श्रमदान उपक्रम राबवून रस्त्यावर असलेली माती व खडी बाजूला करून रस्त्याची बांधणी चांगल्या स्थितीत करून या रस्त्याची नव्या स्वरूपात दुरुस्ती करण्याचे सेवाभावी काम केले आहे. त्यामुळे या संघटनेला धावडेवाडीतील सर्वच ग्रामस्थांकडून धन्यवाद देण्यात आले आहेत. एकूणच प्रशासनाचे काम या संघटनेने करून आपला नवा आदर्श निर्माण केला आहे. त्यामुळे येथील रिक्षा संघटनेच्या सर्वच सदस्यांचे मालगुंड परिसरातून विशेष कौतुक होत आहे.

