( रत्नागिरी /प्रतिनिधी )
तालुक्यातील ग्रामीण रुग्णालय, पाली येथे दिव्यांग बांधवांसाठी गुरुवारी दिनांक ६ नोव्हेंबर २०२५ रोजी नवीन ऑनलाइन प्रमाणपत्र वितरण शिबिर आयोजित करण्यात आले. शिबिरामध्ये उपस्थित असलेल्या अधिकाऱ्यांचा राष्ट्रीय अपंग विकास महासंघ आणि संजीवन दिव्यांग विकास संस्थेच्या वतीने पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले. या शिबिरात अनेक दिव्यांग बांधवांनी प्रमाणपत्रासाठी अर्ज सादर केले. मात्र, प्रमाणपत्रांमध्ये मिळणाऱ्या अपंगत्वाच्या टक्केवारीत घट झाल्याची तक्रार बांधवांनी व्यक्त केली.
या पार्श्वभूमीवर दिव्यांग बांधवांची टक्केवारी वयानुसार वाढविण्याबाबत महत्त्वपूर्ण चर्चा ग्रामीण रुग्णालयातील वरिष्ठ अधिकाऱ्यांशी करण्यात आली. या चर्चेदरम्यान संजीवन दिव्यांग विकास संस्था या संघटनेचे पदाधिकारी उपस्थित राहून दिव्यांग बांधवांच्या विविध अडचणी, अपेक्षा आणि शासकीय पातळीवरील अडथळे याविषयी सविस्तर मांडणी केली. या वेळी राष्ट्रीय अपंग विकास महासंघाचे जिल्हाअध्यक्ष राकेश कांबळे, जिल्हा उपाध्यक्ष मनोहर मेलगे, जिल्हा सचिव नंदकुमार कांबळे, उपसचिव गणपत ताम्हणकर, तसेच कार्याध्यक्ष विश्वास सावंत आदी मान्यवर उपस्थित होते. सर्व पदाधिकाऱ्यांनी एकमुखाने मत व्यक्त करत, दिव्यांग बांधवांच्या प्रमाणपत्र प्रक्रियेत पारदर्शकता, न्याय आणि वयानुसार टक्केवारी वाढीचा मुद्दा शासनदरबारी पोहोचविण्याची मागणी केली आहे.

