(रत्नागिरी)
शालेय विद्यार्थ्यांच्या सुरक्षित वाहतुकीला प्रशासनातर्फे सर्वोच्च प्राधान्य देण्यात आले असून सर्व स्कूल बस चालक आणि मालकांनी आपल्या वाहनांची आवश्यक कागदपत्रे वैध ठेवावीत, असे आवाहन रत्नागिरीचे उप प्रादेशिक परिवहन अधिकारी राजवर्धन करपे यांनी केले आहे.
वाहनांची सर्व आवश्यक कागदपत्रे वैध नसल्यास कोणतीही स्कूल बस विद्यार्थी वाहतुकीसाठी रस्त्यावर चालवू नये, असे स्पष्ट निर्देश आरटीओ कार्यालयाकडून देण्यात आले आहेत.
स्कूल बस चालक व मालकांकडे खालील कागदपत्रे आणि परवाने वैध असणे बंधनकारक असल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले आहे :
- वाहनाचे नोंदणी प्रमाणपत्र (RC)
- योग्यता प्रमाणपत्र (Fitness Certificate)
- परवाना (Permit) व विमा (Insurance)
- प्रदूषण नियंत्रण प्रमाणपत्र (PUC)
- चालकाचा वैध ड्रायव्हिंग लायसन्स आणि बॅज
स्कूल बसची कागदपत्रे विधीग्राह्य करण्यासाठी आरटीओ कार्यालयात सादर होणाऱ्या अर्जांना विशेष प्राधान्य दिले जात असल्याची माहितीही देण्यात आली. सर्व स्कूल बस धारकांनी या सुविधेचा लाभ घेऊन आवश्यक कागदपत्रांची पूर्तता तातडीने करून घ्यावी, असे आवाहन करण्यात आले आहे.
विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेसाठी केवळ आरटीओ प्रशासनच नव्हे, तर शाळा व्यवस्थापन आणि पालकांनीही सतर्क राहणे आवश्यक असल्याचे प्रशासनाने नमूद केले आहे. विद्यार्थ्यांची वाहतूक कोणत्याही अनधिकृत, अवैध किंवा धोकादायक पद्धतीने होणार नाही, याची दक्षता घ्यावी. विद्यार्थ्यांनी केवळ वैध कागदपत्रे असलेल्या सुरक्षित वाहनांतूनच प्रवास करावा, याकडे पालक आणि शाळांनी विशेष लक्ष द्यावे, असे आवाहन करण्यात आले आहे.
तसेच, १८ वर्षांखालील अल्पवयीन विद्यार्थ्यांकडे वैध वाहन परवाना नसतो. त्यामुळे कोणत्याही परिस्थितीत अल्पवयीन विद्यार्थ्यांकडून वाहन चालवले जाणार नाही, याची काटेकोर दक्षता पालक आणि शिक्षकांनी घ्यावी, असेही प्रशासनाने स्पष्ट केले आहे.
वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाऱ्या तसेच अवैध पद्धतीने विद्यार्थ्यांची वाहतूक करणाऱ्या वाहनांवर विशेष तपासणी मोहीम राबवून कठोर कायदेशीर कारवाई करण्यात येणार असल्याचा इशारा उप प्रादेशिक परिवहन अधिकारी राजवर्धन करपे यांनी दिला आहे.

