(रत्नागिरी / वार्ताहर )
रस्त्यावर अचानक आलेल्या भटक्या गाईला वाचविण्याच्या प्रयत्नात एसटी बसचा अपघात झाल्याची घटना आज सकाळी साडेसहा वाजण्याच्या सुमारास तालुक्यातील निवेंडी फाट्यानजीक घडली.
मिळालेल्या माहितीनुसार, बोरिवली-जयगड (एमएच-२०-बीएल-२९४५) ही एसटी बस निवेंडी फाट्याच्या पुढील भागातून जात असताना रस्त्यावर असलेली गाय अचानक बससमोर आली. गाईला वाचवण्याचा प्रयत्न करताना चालकाचे बसवरील नियंत्रण सुटले आणि बस रस्ता सोडून झाडावर जाऊन आदळली.
या अपघातावेळी बसमध्ये सुमारे सहा प्रवासी प्रवास करत होते. सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नसून कोणालाही गंभीर दुखापत झालेली नाही, अशी माहिती घटनास्थळावरून मिळाली आहे.
झाडाला जोरदार धडक बसल्याने बसच्या पुढील भागाचे मोठे नुकसान झाले असून पुढील काच पूर्णपणे फुटली आहे. चालकाच्या प्रसंगावधानामुळे मोठी दुर्घटना टळल्याची चर्चा परिसरात सुरू आहे.

