(रत्नागिरी / निलेश कोकमकर)
रत्नागिरी जिल्ह्यातील कळझोंडी गावातील जि.प. पूर्ण प्राथमिक केंद्रशाळा, कळझोंडी क्रमांक–२ ही शाळा आपल्या स्थापनेची ७५ वर्षे पूर्ण करत असून, या निमित्ताने शनिवार, दिनांक ११ एप्रिल २०२६ रोजी अमृत महोत्सव सोहळा उत्साहात साजरा केला जाणार आहे. जिल्हा परिषद शाळा बंद होण्याच्या पार्श्वभूमीवर हा उपक्रम शिक्षणप्रेमींसाठी अभिमानाची बाब ठरत आहे.
गेल्या सात दशकांहून अधिक काळ या शाळेने विद्यार्थ्यांना केवळ शिक्षणच नव्हे, तर संस्कार, मूल्ये आणि जीवनाला दिशा देणारे मार्गदर्शन दिले आहे. या ज्ञानमंदिरातून घडलेल्या अनेक पिढ्या आज विविध क्षेत्रात यशस्वीपणे कार्यरत असून, त्यांच्या यशामागे या शाळेचा मोठा वाटा आहे. त्यामुळे हा अमृत महोत्सव केवळ औपचारिक कार्यक्रम नसून, माजी विद्यार्थ्यांच्या कृतज्ञतेची जिवंत अभिव्यक्ती ठरत आहे.
या सोहळ्याचे विशेष वैशिष्ट्य म्हणजे माजी विद्यार्थी संघाने घेतलेला पुढाकार. त्यांच्या नियोजनबद्ध आणि उत्साही प्रयत्नांमुळे कार्यक्रम अधिक भव्य आणि संस्मरणीय ठरणार आहे. शाळा व्यवस्थापन समिती, शिक्षकवृंद आणि ग्रामस्थ यांच्या सहकार्याने हा उपक्रम साकार होत असून, सर्व स्तरातून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे.
कार्यक्रमाच्या निमित्ताने विविध सांस्कृतिक उपक्रमांचे आयोजन करण्यात आले असून, माजी विद्यार्थ्यांना आपल्या कला-गुणांचे सादरीकरण करण्याची संधी दिली जाणार आहे. या उपक्रमांसाठी लागणाऱ्या निधीसाठी माजी विद्यार्थी संघाने देणगीचे आवाहन केले असून, गावातील नागरिक आणि माजी विद्यार्थी यांच्याकडून मोठा प्रतिसाद मिळत आहे. “ज्यांनी आपल्याला घडवलं, त्यांच्यासाठी काहीतरी देणं हीच खरी कृतज्ञता” या भावनेतून अनेकांनी सहकार्याचा हात पुढे केला आहे.
या उपक्रमासाठी संदीप वीर (Google Pay: 9594106543) यांच्यामार्फत देणगी स्वीकारली जात आहे. अधिक माहितीसाठी संतोष निंबरे (8928790705), गणेश पाष्टे (9819713765), एकनाथ निंबरे (9820420989), प्रकाश घाणेकर (9619112013) आणि सुधाकर वीर (9930795438) यांच्याशी संपर्क साधावा, असे कळविण्यात आले आहे.
अमृत महोत्सवाच्या पार्श्वभूमीवर संपूर्ण गावात उत्साहाचे वातावरण असून, माजी विद्यार्थी संघाच्या नेतृत्वाखाली हा सोहळा देखणा आणि प्रेरणादायी ठरणार आहे. हा उपक्रम केवळ एक उत्सव न राहता, पुढील पिढ्यांसाठी प्रेरणादायी ठरेल, यात शंका नाही.

