(गुहागर)
गुहागर तालुक्यातील उमराठ खुर्द येथील आंबेकरवाडीचा सुपुत्र ओम्कार रेणुका दामोदर आंबेकर याची नुकतीच मुंबई पोलिस दलात निवड झाल्याने ग्रामपंचायत उमराठ आणि ग्रामस्थांच्या वतीने त्याचा विशेष सत्कार करण्यात आला. आज शुक्रवार, दि. १२ जून २०२६ रोजी आयोजित विशेष ग्रामसभेत हा सन्मान सोहळा पार पडला.
ग्रामपंचायत उमराठचे विद्यमान प्रशासक जनार्दन आंबेकर यांच्या हस्ते तसेच गावचे मानकरी अनिल पवार आणि पंचायत समिती सदस्य संदीप गोरिवले यांच्या उपस्थितीत ओम्कार आंबेकर यांचा शाल, श्रीफळ आणि पुष्पगुच्छ देऊन गौरव करण्यात आला.
कोकणातील युवकांमध्ये पूर्वी पोलिस सेवेकडे पाहण्याचा कल कमी होता. मात्र, वाढती सुशिक्षित बेरोजगारी आणि मर्यादित सरकारी भरती यामुळे आज अनेक युवक-युवती पोलिस सेवेकडे आकर्षित होत आहेत. मेहनत, सातत्य आणि जिद्दीच्या बळावर कोकणातील अनेक तरुण पोलिस दलात स्थान मिळवत असून ओम्कार आंबेकर याची निवडही त्याच प्रेरणादायी प्रवासाचा भाग ठरली आहे.
यावेळी मनोगत व्यक्त करताना ओम्कार आंबेकर म्हणाला, “शालेय जीवनापासूनच पोलिस सेवेत जाऊन समाजसेवा करण्याची इच्छा होती. त्यासाठी मी सातत्याने प्रयत्न केले. कोणत्याही कोचिंग क्लास किंवा अकॅडमीत प्रवेश न घेता नियमित व्यायाम, धावणे, गोळाफेक, उंच उडी यांसारख्या मैदानी सरावावर भर दिला. तसेच लायब्ररीत बसून लेखी परीक्षेची तयारी केली. एक-दोन वेळा संधी हुकली, मात्र मी जिद्द सोडली नाही. अखेर मुंबई पोलिस भरतीत निवड झाली असून आता कर्तव्यातून समाजसेवा करण्यास उत्सुक आहे.”
यावेळी उमराठचे प्रशासक जनार्दन आंबेकर, पंचायत समिती सदस्य संदीप गोरिवले आणि गावचे मानकरी अनिल पवार यांनी ओम्कारचे कौतुक करून पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. ओम्कार आंबेकर यांच्या यशाबद्दल उमराठ पंचक्रोशीतून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.
विशेष ग्रामसभेस कृषी अधिकारी सुजय कुतळकर, हेदवी सजाचे ग्राम महसूल अधिकारी सुशिल परिहार, पंचायत समिती सदस्य संदीप गोरिवले तसेच मोठ्या संख्येने महिला व पुरुष ग्रामस्थ उपस्थित होते.
कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी ग्रामपंचायत कर्मचारी नितीन गावणंग, प्रशांत कदम आणि साईस दवंडे यांनी विशेष सहकार्य केले.

