(गणपतीपुळे / वैभव पवार)
गेल्या काही दिवसांपासून समुद्रात बुडणाऱ्या पर्यटकांची संख्या वाढत असल्याचे दिसून आले आहे.bतसेच दोन पर्यटकांचा समुद्रात बुडून मृत्यू झाला आहे. तर समुद्रात बुडालेला पेण रायगड येथील एक पर्यटक अद्याप बेपत्ताच असून तो मिळून आलेला नाही.
या पार्श्वभूमीवर रत्नागिरी जिल्हा पोलीस आणि जयगड सागरी पोलीस ठाणे यांच्यावतीने आणि संस्थान श्री देव गणपतीपुळे यांचे सौजन्याने गणपतीपुळे समुद्र किनाऱ्यावर समुद्राच्या धोकादायक स्थितीबद्दल माहिती देणारा फलक लावण्यात आला असून त्यावर “सावध रहा, सतर्क रहा” घरी आपली कोणीतरी वाट पाहत आहे, अशा आशयाचे आवाहन करण्यात आले आहे.
तसेच जयगड सागरी पोलीस ठाण्याकडून समुद्रकिनाऱ्यावर गांभीर्याने व कटाक्षाने गस्त घालून विशेष मोहीम राबविण्यात येत आहे.त्यातच विशेष म्हणजे समुद्र किनाऱ्यावरील परिस्थिती गंभीर झालेली असल्यामुळे जयगड सागरी पोलीस ठाण्याचे कर्तव्यदक्ष सहाय्यक पोलीस निरीक्षक संजय पाटील हे आपल्या पोलीस कर्मचाऱ्यांबरोबर स्वतः समुद्राच्या पाण्यात उतरून खोल पाण्यात जाण्याचा प्रयत्न करणाऱ्या पर्यटकांना समुद्राच्या पाण्याबाहेर काढण्याचे काम अतिशय जबाबदारीने आणि गांभीर्यपूर्वक करीत आहेत. त्यांच्यासमवेत इतर पोलिस कर्मचारी आणि गणपतीपुळे ग्रामपंचायतीचे जीवरक्षक पर्यटकांना समुद्राच्या धोक्याबाबत माहिती देण्याचे काम कटाक्षाने करीत आहेत.
सध्या गणपतीपुळे समुद्र हा धोकादायक स्थितीत आहे. परंतु काही अतिउत्साही पर्यटकांमुळे समुद्रात बुडण्याच्या घटना घडत आहेत.या घटनेला आता आळा घालण्यासाठी येणाऱ्या सर्वच भाविक व पर्यटकांनी समुद्राच्या धोक्याची स्थिती लक्षात घेऊन समुद्रस्नानासाठी खोल पाण्यात जाऊ नये. समुद्र किनाऱ्यावर लावलेल्या जाहीर सूचना व आवाहन फलकाचे प्रत्येक पर्यटकांनी पालन करून रत्नागिरी जिल्हा पोलीस आणि जयगड सागरी पोलीस ठाण्याला सहकार्य करावे.
– श्री. संजय पाटील, सहाय्यक पोलीस निरीक्षक
जयगड सागरी पोलीस ठाणे.

