( रत्नागिरी /प्रतिनिधी )
अशोक विजयादशमी अर्थात धम्मचक्र प्रवर्तन दिनानिमित्त थिबाराजा कालीन बुद्धविहार बचाव संघर्ष समितीच्या वतीने मंगळवार, २० ऑक्टोबर रोजी रत्नागिरीत विविध धार्मिक व प्रबोधनात्मक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. बुद्धविहार येथे दीपप्रज्वलन व पुष्पार्पण, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याजवळ मानवंदना, तसेच स्मारक भवनात मार्गदर्शन सभा अशा स्वरूपात हा कार्यक्रम पार पडणार आहे.
कार्यक्रमाची सुरुवात सकाळी १०.३० वाजता थिबाराजा कालीन बुद्धविहार येथे दीपप्रज्वलन व पुष्पार्पणाने होईल. त्यानंतर सकाळी ११ वाजता डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याजवळ पुष्पमालिका अर्पण, समता सैनिक दलाची मानवंदना आणि त्रिशरण-पंचशील विधी होणार आहे. सकाळी ११.३० वाजता डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक भवन येथे कु. मृणाली कांबळे यांचे मार्गदर्शन आणि सभा आयोजित करण्यात आली आहे.
धम्मचक्र प्रवर्तन दिन हा समता, स्वातंत्र्य, बंधुता आणि मानवी मूल्यांचा संदेश देणारा महत्त्वपूर्ण दिवस आहे. या निमित्ताने आयोजित कार्यक्रमाला सर्व धार्मिक संघटनांचे पदाधिकारी, रत्नागिरीतील गावशाखांचे पदाधिकारी, सभासद तसेच सर्व धम्मबांधवांनी बहुसंख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन थिबाराजा कालीन बुद्धविहार बचाव संघर्ष समितीच्या वतीने करण्यात आले आहे.


