(रत्नागिरी)
जिल्ह्यातील तडीपारीची प्रलंबित प्रकरणे तत्काळ निकाली काढण्याचे निर्देश जिल्हाधिकारी मनुज जिंदल यांनी दिले. तसेच अंमली पदार्थविरोधी जनजागृत्ती मोहिमेत सहभागी होऊन पोस्टर्स स्पर्धेत उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या विद्यार्थ्यांना प्रशस्तीपत्र देऊन गौरविण्यात येईल, असेही त्यांनी स्पष्ट केले.
नार्को को-ऑर्डिनेशन यंत्रणेच्या जिल्हास्तरीय समितीची बैठक आज पार पडली. या बैठकीस पोलीस अधीक्षक नितीन बगाटे, अतिरिक्त पोलीस अधीक्षक बी.बी. महामुनी, पोलीस निरीक्षक नितीन ढेरे, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. भास्कर जगताप, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. अनिरुद्ध आठल्ये, तसेच जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी शिवकुमार सदाफुले आदी उपस्थित होते.
बैठकीत पोलीस अधीक्षक नितीन बगाटे यांनी उपविभागीय पोलीस अधिकाऱ्यांकडून सविस्तर आढावा घेतला. जिल्ह्यातील व्यसनमुक्ती केंद्रांची अद्ययावत माहिती संकलित करण्याच्या सूचना त्यांनी जिल्हा शल्यचिकित्सकांना दिल्या. शिक्षण विभागाने आयोजित केलेल्या पोस्टर्स स्पर्धेचे त्यांनी कौतुक करत, त्या उत्कृष्ट पोस्टर्सचे प्रदर्शन भरविण्याची सूचना केली.
यावेळी जिल्हाधिकारी मनुज जिंदल यांनी सर्व संबंधित विभागांनी अंमली पदार्थांविरोधात अधिक सतर्क राहून ठोस कारवाई करावी, असे निर्देश दिले. पुढील बैठकीत पोस्टर्स स्पर्धेत सहभागी विद्यार्थ्यांचा प्रशस्तीपत्र देऊन सन्मान करण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.

