(वॉशिंग्टन / वृत्तसंस्था)
अमेरिकेने इमिग्रेशन नियमांची कडक अंमलबजावणी करत 2025 या एका वर्षात एक लाखांहून अधिक व्हिसा रद्द केले आहेत. यूएस स्टेट डिपार्टमेंटने केलेली ही आतापर्यंतची सर्वांत मोठी कारवाई मानली जात असून, याचा थेट परिणाम जगभरातील विद्यार्थी, व्यावसायिक आणि पर्यटकांवर झाला आहे. विशेषतः भारतीय नागरिकांना या निर्णयाचा मोठा फटका बसल्याचे चित्र आहे.
स्टेट डिपार्टमेंटने दिलेल्या माहितीनुसार, 2025 मध्ये आतापर्यंत एक लाखांपेक्षा अधिक व्हिसा रद्द करण्यात आले आहेत. या कारवाईत विद्यार्थी व्हिसा, वर्क व्हिसा, पर्यटक व्हिसा तसेच विशेष श्रेणीतील व्हिसांचा समावेश आहे. अमेरिकेत शिक्षण, नोकरी किंवा प्रवासाचे नियोजन करणाऱ्या नागरिकांमध्ये या निर्णयामुळे चिंता वाढली आहे.
या कारवाईमागे ट्रम्प प्रशासनाचे आक्रमक इमिग्रेशन धोरण कारणीभूत असल्याचे सांगितले जात आहे. अमेरिकेतील प्रवेश अधिक सुरक्षित आणि नियंत्रित करण्याच्या उद्देशाने ही मोहीम राबवली जात असून, ही प्रक्रिया अजूनही सुरू आहे. त्यामुळे येत्या काळात आणखी मोठ्या प्रमाणावर व्हिसा रद्द होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
स्टेट डिपार्टमेंटच्या माहितीनुसार, आतापर्यंत रद्द करण्यात आलेल्या व्हिसांमध्ये सुमारे 8 हजार विद्यार्थी व्हिसांचा समावेश आहे. याशिवाय गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेल्या व्यक्तींशी संबंधित सुमारे 2,500 विशेष श्रेणीतील व्हिसाही रद्द करण्यात आले आहेत. तज्ज्ञांच्या मते, गेल्या वर्षीच्या तुलनेत ही संख्या जवळपास दुप्पट असून, अमेरिकेच्या परदेशी नागरिकांबाबतच्या धोरणात मोठा बदल झाल्याचे संकेत मिळत आहेत.
रद्द करण्यात आलेल्या व्हिसांमध्ये सर्वाधिक प्रमाण व्यावसायिक आणि पर्यटक व्हिसांचे आहे. व्हिसाची मुदत संपल्यानंतरही अमेरिकेत बेकायदेशीररीत्या मुक्काम वाढवणे, नियमांचे उल्लंघन करणे, तसेच कायदेशीर अडचणींमध्ये अडकणे ही प्रमुख कारणे असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे. ड्रंक अॅण्ड ड्राइव्ह, प्राणघातक हल्ला, चोरी यासारख्या गुन्ह्यांचा उल्लेख अनेक प्रकरणांमध्ये करण्यात आला आहे.
व्हिसा अटींचे उल्लंघन, मुदतीपेक्षा जास्त वास्तव्य आणि गुन्हेगारी प्रकरणांमध्ये सहभाग असलेल्या व्यक्तींवर विशेष लक्ष केंद्रित करण्यात आले आहे. अमेरिकेची सुरक्षा अबाधित ठेवण्यासाठी अशा व्यक्तींना मायदेशी पाठवण्याची कारवाई पुढेही सुरू राहणार असल्याचे स्टेट डिपार्टमेंटने स्पष्ट केले आहे.
या पार्श्वभूमीवर अमेरिकेत शिक्षण, नोकरी किंवा प्रवासाची तयारी करणाऱ्या भारतीय नागरिकांनी व्हिसा नियमांचे काटेकोर पालन करण्याचा सल्ला तज्ज्ञांकडून दिला जात आहे.

