(मुंबई)
भारतीय रेल्वेने प्रवाशांसाठी महत्त्वपूर्ण अपडेट जारी केले आहेत. 1 ऑक्टोबर 2025 पासून तिकीट बुकिंगच्या नियमांमध्ये नवीन बदल लागू होणार आहेत. हे बदल 1 जुलै 2025 पासून लागू झालेल्या आधार कार्ड आधारित बुकिंगनंतरचा दुसरा महत्त्वाचा नियम आहेत. सामान्य प्रवाशांना तिकीट सहज मिळावे आणि दलालांद्वारे होणारा गैरवापर थांबवावा, असा यामागचा स्पष्ट उद्देश आहे.
रेल्वे मंत्रालयाने परिपत्रकाद्वारे स्पष्ट केले आहे की, 1 ऑक्टोबरपासून जनरल रिझर्व्हेशन सुरू होण्याच्या पहिल्या 15 मिनिटांमध्ये केवळ आधार-प्रमाणित (Aadhaar authenticated) वापरकर्त्यांना IRCTC वेबसाइट किंवा ॲपवरून तिकीट बुक करण्याची परवानगी असेल. यापूर्वी हा नियम फक्त तत्काळ तिकिटांसाठी लागू होता.
रेल्वे अधिकाऱ्यांच्या मते, 15 मिनिटांनंतर तिकीट एजंट्सना बुकिंग करण्याची परवानगी दिली जाईल, तर PRS काउंटरद्वारे तिकीट बुकिंगच्या पद्धतीत कोणताही बदल नाही. आधीच लागू असलेल्या नियमानुसार, जनरल रिझर्व्हेशन सुरू होण्याच्या पहिल्या 10 मिनिटांमध्ये काउंटरवरून तिकीट एजंट्स बुकिंग करू शकत नाहीत आणि हा नियम पुढेही सुरू राहील.
या नवीन नियमामुळे:
- सामान्य प्रवाशांना तिकीट मिळण्याची संधी वाढेल.
- तिकीट दलालांकडून होणारा गैरवापर नियंत्रित होईल.
- बुकिंग प्रक्रिया अधिक पारदर्शक आणि सुरक्षित बनेल.
- मात्र काही प्रवाशांना त्याबाबत माहिती नसल्याने अडचणींचा सामना करावा लागू शकतो:
- ज्यांच्याकडे आधार प्रमाणीकरण नाही, त्यांना 15 मिनिटे प्रतीक्षा करावी लागेल.
- ग्रामीण भागातील किंवा कमी तांत्रिक ज्ञान असलेले प्रवासी या सुरुवातीच्या काळात प्रक्रियेचा त्रास होणार आहे.
टीप: IRCTC वरून ऑनलाइन तिकीट बुक करण्यापूर्वी तुमचे खाते आधारशी प्रमाणीकरण केलेले असणे आवश्यक आहे. त्यासाठी IRCTC खात्यात लॉगिन करा, “Authenticate User” पर्यायावर क्लिक करा, आधार क्रमांक टाका आणि OTP द्वारे सत्यापित करा.

