(रत्नागिरी / वार्ताहर)
रत्नागिरीचा युवा क्रिकेटपटू अफसान शाहिद मिरकर याची १९ वर्षांखालील महाराष्ट्राच्या संघात निवड झाली आहे. राष्ट्रीय आंतरशालेय क्रिकेट स्पर्धेत महाराष्ट्राचे प्रतिनिधित्व करण्याची संधी मिळाल्याने अफसानवर रत्नागिरीतील क्रिकेटप्रेमींकडून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. त्याच्या या निवडीमुळे छोटू देसाई क्रिकेट अकॅडमी आणि अभ्यंकर-कुलकर्णी महाविद्यालयाच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला गेला आहे.
अफसान सध्या रत्नागिरीतील अभ्यंकर-कुलकर्णी महाविद्यालयाच्या संघाकडून क्रिकेट खेळत असून, गेल्या चार वर्षांपासून तो छोटू देसाई क्रिकेट अकॅडमीमध्ये प्रशिक्षण घेत आहे. वेगवान गोलंदाज, उपयुक्त फलंदाज आणि उत्कृष्ट क्षेत्ररक्षक अशी अष्टपैलू कामगिरी करत त्याने रत्नागिरीच्या क्रिकेट क्षेत्रात आपली ओळख निर्माण केली आहे. स्वतःच्या गुणवत्तेच्या जोरावर त्याने महाराष्ट्राच्या १९ वर्षांखालील संघात स्थान मिळवले आहे.
राष्ट्रीय स्तरावरील आंतरशालेय क्रिकेट स्पर्धेत खेळण्याची मिळालेली संधी अफसानसाठी महत्त्वपूर्ण मानली जात आहे. या स्पर्धेत तो आपल्या कौशल्याची छाप पाडेल आणि छोटू देसाई क्रिकेट अकॅडमी, अभ्यंकर-कुलकर्णी महाविद्यालय तसेच रत्नागिरीचे नाव उज्ज्वल करेल, असा विश्वास रत्नागिरीतील क्रिकेटप्रेमी आणि जाणकार क्रिकेटपटूंनी व्यक्त केला आहे.
दरम्यान, महाराष्ट्राच्या १९ वर्षांखालील शालेय क्रिकेट संघाचे प्रशिक्षण शिबिर लवकरच मध्य प्रदेश येथे आयोजित करण्यात येणार असून, राष्ट्रीय आंतरशालेय १९ वर्षांखालील क्रिकेट स्पर्धाही मध्य प्रदेश येथेच होणार असल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली आहे.
अफसानच्या या यशाबद्दल रविवार, २५ ऑक्टोबर २०२६ रोजी सायंकाळी ६ वाजता छोटू देसाई क्रिकेट अकॅडमीच्या वतीने त्याचा विशेष सत्कार करण्यात आला. यावेळी त्याला पुढील क्रिकेट कारकिर्दीसाठी शुभेच्छा देण्यात आल्या.
या सत्कार समारंभाला छोटू देसाई क्रिकेट अकॅडमीचे प्रमुख आणि रत्नागिरीत रेड बॉल क्रिकेटच्या विकासासाठी विशेष योगदान देणारे श्री. दीपक देसाई सर, गजेंद्र पाथरे, अकॅडमीचे अन्य पदाधिकारी, मुख्य प्रशिक्षक व माजी रणजीपटू श्री. हरीश लाडे, प्रशिक्षक श्री. महेंद्र सुर्वे, दिवाकर मयेकर, दर्शना पवार तसेच रत्नागिरीतील क्रिकेटप्रेमी पालक उपस्थित होते.
अफसानच्या राष्ट्रीय संघातील निवडीमुळे रत्नागिरीतील युवा क्रिकेटपटूंना प्रेरणा मिळणार असून, त्याच्या पुढील कामगिरीकडे क्रिकेटप्रेमींचे लक्ष लागले आहे.


