(रायगड / वृत्तसंस्था)
रायगड जिल्ह्यातील अलिबाग येथे पर्यटनासाठी आलेल्या २५ वर्षीय तरुणाचा वरसोली येथील लॉजवर संशयास्पद परिस्थितीत मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे. विशेष म्हणजे, मृत तरुणाच्या नातेवाईकांनी शवविच्छेदन करण्यास नकार दिल्यानंतर जिल्हा रुग्णालयातील महिला डॉक्टरने कोणतेही लेखी पत्र न घेता आणि जिल्हा शल्यचिकित्सकांची परवानगी न घेता मृतदेह त्यांच्या ताब्यात दिल्याचा प्रकार समोर आला आहे. या घटनेमुळे संबंधित डॉक्टरच्या निर्णयावर प्रश्न उपस्थित होत असून, अलिबाग पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद करून तपास सुरू केला आहे.
ही घटना बुधवार, १४ ऑक्टोबर रोजी घडली. रायगड जिल्ह्यातील कोर्लई येथील हा तरुण आपल्या होणाऱ्या पत्नीसोबत वरसोली समुद्रकिनारी फिरण्यासाठी आला होता. या दोघांनी वरसोली येथील ‘लोटस लॉज’मध्ये मुक्कामासाठी खोली आरक्षित केली होती. लॉजवर असतानाच तरुणाचा अचानक मृत्यू झाला. त्यानंतर सायंकाळी सहा वाजण्याच्या सुमारास त्याच्यासोबत असलेल्या तरुणीने आणि नातेवाईकांनी मृतदेह अलिबाग जिल्हा रुग्णालयात आणला.
त्यावेळी रुग्णालयाच्या अपघात विभागात डॉ.मालवणकर कर्तव्यावर होत्या. नातेवाईकांनी शवविच्छेदन करण्याची इच्छा नसल्याचे सांगितल्यानंतर त्यांनी मृतदेह त्यांच्या ताब्यात दिला. मात्र, यासाठी आवश्यक लेखी संमतीपत्र घेण्यात आले नसल्याचे तसेच जिल्हा शल्यचिकित्सकांची परवानगीही घेण्यात आली नसल्याचे समोर आले आहे. संशयास्पद मृत्यूच्या प्रकरणांमध्ये कायदेशीर प्रक्रिया पूर्ण केल्यानंतरच मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्याची पद्धत असताना, या प्रकरणात त्याचे पालन झाले का, असा प्रश्न उपस्थित झाला आहे.
दरम्यान, तरुणाचा मृत्यू संशयास्पद असल्याने शवविच्छेदन करणे आवश्यक होते. डॉ. मालवणकर यांनी पोलिसांना दूरध्वनी करून माहिती दिली होती. मात्र, पोलीस रुग्णालयात पोहोचण्यापूर्वीच नातेवाईक मृतदेह घेऊन निघून गेले. मृतदेह अशा प्रकारे परस्पर नेण्यात आल्याने प्रकरणाबाबत संशय अधिक वाढला.
रुग्णालयाकडून संपर्क साधण्यात आल्यानंतर नातेवाईकांनी मृतदेह पुन्हा रुग्णालयात आणला. त्यानंतर शवविच्छेदनाची प्रक्रिया पूर्ण करून मृतदेह त्यांच्या ताब्यात देण्यात आला. शवविच्छेदनादरम्यान व्हिसेरा सुरक्षित ठेवण्यात आला असून, पुढील तपासणीसाठी तो फॉरेन्सिक प्रयोगशाळेत पाठवला जाणार आहे. तरुणाचा मृत्यू नेमका कोणत्या कारणामुळे झाला आणि या प्रकरणातील संशयाचे निराकरण कसे होते, याकडे आता लक्ष लागले आहे.


