( रत्नागिरी / वार्ताहर )
कोकणातून अधिकाधिक खेळाडूंनी ऑलिंपिकमध्ये देशाचे प्रतिनिधित्व करावे, यासाठी मुंबई विद्यापीठाच्या क्रीडा स्पर्धांपैकी किमान ५ ते १० स्पर्धा कोकणात आयोजित करणे आवश्यक आहे. क्रीडा क्षेत्राच्या विकासासाठी आणि दर्जेदार खेळाडू घडवण्यासाठी विद्यापीठ प्रयत्नशील असून, यंदापासून प्रथमच सर्वोत्कृष्ट पुरुष व महिला खेळाडूंची निवड करण्यात येणार आहे. तसेच क्रीडा संचालकांना पारितोषिक आणि ‘मिशन ऑलिंपिक मोड’अंतर्गत प्रशिक्षकांसाठीही विशेष तरतूद करण्यात येत आहे, अशी माहिती मुंबई विद्यापीठाचे क्रीडा संचालक डॉ. मनोज रेड्डी यांनी दिली.
गोगटे-जोगळेकर महाविद्यालयाच्या बॅडमिंटन हॉलमध्ये मुंबई विद्यापीठाच्या आंतरमहाविद्यालयीन तायक्वांदो स्पर्धेचे उद्घाटन डॉ. मनोज रेड्डी यांच्या हस्ते दीपप्रज्वलन आणि मैदानावर श्रीफळ वाढवून करण्यात आले. या वेळी जिमखाना विभागप्रमुख डॉ. चंद्रशेखर केळकर अध्यक्षस्थानी होते. प्राचार्य डॉ. मकरंद साखळकर, निवड समिती सदस्य डॉ. विश्वंभर जाधव, डॉ. आदित्य कुलकर्णी, जयदीप कदम, तायक्वांदोचे आंतरराष्ट्रीय रेफ्री व राष्ट्रीय फेडरेशनचे संचालक सुभाष पाटील, तायक्वांदो असोसिएशनचे अध्यक्ष व्यंकटेशराव कररा, जिमखाना उपाध्यक्ष डॉ. विवेक भिडे, उपप्राचार्य डॉ. सीमा कदम, डॉ. अपर्णा कुलकर्णी, प्रबंधक नंदकिशोर गोळपकर, कनिष्ठ महाविद्यालयाचे उपप्राचार्य सुनील गोसावी आणि क्रीडा संचालक डॉ. विनोद शिंदे उपस्थित होते.
मुंबई विद्यापीठात दरवर्षी ४० प्रकारच्या क्रीडा स्पर्धा आयोजित केल्या जातात. या स्पर्धांमधून खेळाडूंना पुढील स्तरावर जाण्याची संधी मिळते. यंदापासून सर्वोत्कृष्ट पुरुष आणि महिला खेळाडूंची निवड करण्याचा उपक्रम सुरू करण्यात येत आहे. कोकणातील खेळाडूंनाही राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर संधी मिळावी, यासाठी विद्यापीठाच्या क्रीडा स्पर्धा या भागात आयोजित करण्यावर भर देण्यात येणार असल्याचे डॉ. रेड्डी यांनी सांगितले.
तायक्वांदो हा शिस्तीला विशेष महत्त्व देणारा खेळ असून, या प्रकारात भारताला आंतरराष्ट्रीय स्तरावर पदके मिळावीत, या उद्देशाने प्रयत्न सुरू आहेत. यापूर्वी विद्यापीठाचा खेळाडू शुभम शेट्टी याने आंतरराष्ट्रीय स्तरावर सहभाग घेतला होता. त्याला विद्यापीठाने अडीच लाख रुपये अनुदान दिले. खेळाडूंना आवश्यक आर्थिक मदत देण्याकडे विद्यापीठाचा कल असून, अशा प्रकारच्या सहकार्यामुळे त्यांना पुढील वाटचालीस बळ मिळेल, असे डॉ. रेड्डी यांनी स्पष्ट केले. यावेळी शुभम शेट्टी याचा डॉ. रेड्डी यांच्या हस्ते सन्मान करण्यात आला.
तायक्वांदो स्पर्धेच्या आयोजनात पारदर्शकता आणि आंतरराष्ट्रीय दर्जा राखण्यासाठी गेल्या तीन वर्षांपासून सेन्सर तंत्रज्ञानाचा वापर करण्यात येत आहे. नवीन नियमांची अंमलबजावणी केली जात असून, आंतरराष्ट्रीय दर्जाचे पंच स्पर्धेत सहभागी होतात. खेळाडूंचे वजन विद्यापीठातर्फे केले जाते, तर स्पर्धेचे वेळापत्रक सर्वांसमोर तयार केले जाते. आंतरराष्ट्रीय दर्जाचे पंच सुभाष पाटील यांनी देशभरात नावलौकिक मिळवला असून, त्यांच्या मार्गदर्शनाखाली प्रशिक्षित आणि दर्जेदार पंच स्पर्धेचे काम पाहणार आहेत. विविध संघटनांच्या योगदानामुळे तायक्वांदो खेळाचा विस्तार होत आहे. स्पर्धेदरम्यान काही त्रुटी आढळल्यास पुढील स्पर्धेत त्यात सुधारणा करण्यात येईल, अशी ग्वाही डॉ. रेड्डी यांनी दिली.
खेळामुळे मानसिक संतुलन साधण्यास मदत होते, असे प्रतिपादन अध्यक्षीय मनोगतात डॉ. चंद्रशेखर केळकर यांनी केले. तायक्वांदो हा केवळ आत्मरक्षणाचा खेळ नसून त्यातून शिस्त, आत्मविश्वास, एकाग्रता, संयम आणि आत्मनियंत्रण या गुणांचा विकास होतो. खेळ हा केवळ मनोरंजनाचा प्रकार नसून जीवनाचा महत्त्वाचा भाग आहे. खेळामुळे शारीरिक क्षमता वाढण्यासोबतच मानसिक संतुलन आणि उत्तम आरोग्य लाभते. प्रत्येक खेळाडू विजयाच्या जिद्दीने मैदानात उतरतो; मात्र विजय आणि पराभव या एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत. पराभूत खेळाडूंनाही चुका सुधारून भविष्यात अधिक चांगली कामगिरी करण्याची संधी मिळते, असे डॉ. केळकर यांनी सांगितले.
महाविद्यालयाच्या शैक्षणिक वाटचालीची माहिती देताना प्राचार्य डॉ. मकरंद साखळकर म्हणाले की, गोगटे-जोगळेकर महाविद्यालयाची स्थापना १९४५ मध्ये झाली असून, हे स्वातंत्र्यपूर्व काळातील महाविद्यालय आहे. या स्वायत्त महाविद्यालयात सुमारे ७,००० विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. येथे २८ विषयांमध्ये पदवी, १६ विषयांमध्ये पदव्युत्तर पदवी आणि ८ विषयांमध्ये पीएचडी अभ्यासक्रम उपलब्ध आहेत.
या स्पर्धेत ५१ महाविद्यालयांमधील १०० पुरुष आणि १०० महिला अशा एकूण २०० स्पर्धकांनी सहभाग घेतला आहे. चार दिवस चालणाऱ्या या स्पर्धेतून निवडलेले खेळाडू राजस्थान आणि नोएडा येथे होणाऱ्या अखिल भारतीय तायक्वांदो स्पर्धेत मुंबई विद्यापीठाचे प्रतिनिधित्व करणार आहेत.
कार्यक्रमात उपस्थित मान्यवरांचा शाल, श्रीफळ आणि सन्मानचिन्ह देऊन डॉ. चंद्रशेखर केळकर, डॉ. मकरंद साखळकर आणि डॉ. विवेक भिडे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. प्रा. मृदूला जोशी यांनी सूत्रसंचालन केले, तर डॉ. विनोद शिंदे यांनी आभार मानले.
कोकणात क्रीडा संस्कृती रुजवण्यासाठी सहकार्याची ग्वाही
मुंबई विद्यापीठाच्या ४० क्रीडा स्पर्धांपैकी किमान १० स्पर्धा कोकणात व्हाव्यात, यासाठी आपण आग्रही असल्याचे डॉ. मनोज रेड्डी यांनी स्पष्ट केले. क्रीडा क्षेत्राचा विकास आणि गुणवंत खेळाडू घडवण्यासाठी या स्पर्धा कोकणात होणे आवश्यक आहे. रत्नागिरी एज्युकेशन सोसायटीच्या शाळा आणि महाविद्यालयांमध्ये हजारो विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. या विद्यार्थ्यांना आशियाई क्रीडा स्पर्धा आणि ऑलिंपिकपर्यंत पोहोचवायचे असेल, तर शालेय जीवनापासूनच त्यांच्यामध्ये क्रीडा संस्कृती रुजवावी लागेल. त्यासाठी आवश्यक ते सहकार्य केले जाईल, अशी ग्वाही त्यांनी दिली.
सुट्टीचा दिवस असूनही महाविद्यालयाचे प्राचार्य, उपप्राचार्य, प्रबंधक आणि संपूर्ण टीम स्पर्धेच्या आयोजनासाठी कार्यरत असल्याचे पाहून क्रीडा क्षेत्राच्या विकासासाठी सुरू असलेले प्रयत्न योग्य दिशेने जात असल्याचे समाधान वाटल्याचेही डॉ. रेड्डी यांनी नमूद केले. मुले मोबाईलवर गेम खेळण्यात वेळ घालवण्याऐवजी मैदानावर आली पाहिजेत. मैदानावरील सहभागामुळे त्यांचा शारीरिक आणि मानसिक विकास होईल, तसेच अभ्यासातील कामगिरी सुधारण्यासही मदत होईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.


