(रत्नागिरी/राजापूर, प्रतिनिधी)
मुंबई–गोवा महामार्गावरून होत असलेल्या बेकायदेशीर मद्यवाहतुकीवर राज्य उत्पादन शुल्क विभागाने शनिवारी पहाटे धडक कारवाई करत गोवा बनावटीचा विदेशी मद्यसाठा आणि वाहतुकीसाठी वापरण्यात आलेला टेम्पो असा एकूण २३ लाख ६३ हजार १२० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला.
हातीवले टोलनाका येथे पहाटे ४ ते ६ या वेळेत सापळा रचून ही कारवाई करण्यात आली. गोव्याहून मुंबईच्या दिशेने मोठ्या प्रमाणात मद्याची अवैध वाहतूक होत असल्याची खात्रीशीर माहिती विभागाला मिळाली होती. त्यानुसार पथकाने महामार्गावर दक्षता वाढवून संशयित वाहनांची तपासणी सुरू केली.
पहाटेच्या सुमारास गोव्याहून येणाऱ्या Ashok Leyland कंपनीच्या ‘बडा दोस्त’ टेम्पोची (क्र. एमएच ०८ एपी ४३८७) झडती घेतली असता मोठ्या प्रमाणात गोवा बनावटीचा मद्यसाठा आढळून आला. यामध्ये Tuborg स्ट्रॉंग बिअर, Kingfisher स्ट्रॉंग बिअरचे टिन तसेच अन्य विदेशी मद्याचा समावेश होता. जप्त मद्याची किंमत १८ लाख १३ हजार १२० रुपये असून, वाहतुकीसाठी वापरण्यात आलेल्या टेम्पोची अंदाजित किंमत ५ लाख ५० हजार रुपये आहे. एकूण जप्त मुद्देमाल २३ लाख ६३ हजार १२० रुपयांचा आहे.
या प्रकरणी टेम्पो चालक चेतक भरत वाळवे (वय ३०, रा. तिवरे, वाळवेवाडी, ता. कणकवली, जि. सिंधुदुर्ग) याच्याविरुद्ध महाराष्ट्र दारूबंदी कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही कारवाई राज्य उत्पादन शुल्क विभाग, रत्नागिरीचे निरीक्षक आर. जी. मोरे यांच्या मार्गदर्शनाखाली दुय्यम निरीक्षक सी. एल. कदम, जवान रोहित लोंढे, सागर उबाळे व इतर कर्मचाऱ्यांच्या पथकाने अंमलात आणली. बेकायदेशीर मद्यवाहतुकीविरोधात अशा कारवाया यापुढेही सुरू राहणार असल्याचे विभागाने स्पष्ट केले आहे.

