(रत्नागिरी / प्रतिनिधी)
शहरातील चर्मालय परिसरात चार रस्ता नाक्याजवळ एसटी बसने दुचाकीला धडक दिल्याने एक जण जखमी झाला. हा अपघात ११ मार्च रोजी सकाळी साडेआठच्या सुमारास मजगाव ते मारुती मंदिर मार्गावर घडला होता. याप्रकरणी एक महिन्यानंतर एसटी बस चालकाविरोधात निष्काळजीपणे वाहन चालवल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, राहुल सुरेश तेरवणकर (३६, रा. परटवणे) हे ड्युटी संपवून आपल्या होंडा शाईन दुचाकी (क्र. एमएच-०८-एसी-५६५८) वरून साळवी स्टॉपमार्गे घरी जात होते. त्याच दरम्यान, मजगावहून येणाऱ्या एसटी बसने (क्र. एमएच-१४-बीटी-४४६१), जी जैनद्दीन महमदसाहब शेख (४२) यांच्या ताब्यात होती, त्यांनी निष्काळजीपणे व बेदरकारपणे वाहन चालवले. यामुळे बसने राहुल यांच्या दुचाकीला मागील बाजूस जोरदार धडक दिली. या अपघातात राहुल तेरवणकर जखमी झाले होते त्यांच्या दुचाकीचेही नुकसान झाले.
अपघातानंतर पोलिस हवालदार उमेश कृष्णा पवार यांनी रत्नागिरी शहर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. या घटनेला एक महिना उलटला आता मात्र पोलिसांनी बसचालक जैनद्दीन शेख याच्याविरुद्ध भारतीय न्याय संहिता अधिनियम २०२३ अंतर्गत कलम २८१, १२५ (अ) आणि मोटार वाहन कायदा कलम १८४ नुसार गुन्हा नोंदवला आहे.