(संगमेश्वर / एजाज पटेल)
निसर्गाच्या अद्भुत चमत्कारांपैकी एक मानला जाणारा मखमली ‘मिरग’ किडा सध्या कोकणातील ग्रामीण भागात पुन्हा एकदा चर्चेचा विषय ठरत आहे. पावसाळ्याची चाहूल लागण्याच्या काळात जमिनीतून बाहेर येणारा हा तांबूस-लाल रंगाचा मखमली किडा केवळ एक जीव नसून, कोकणातील शेतकऱ्यांसाठी पावसाचा जिवंत संदेशवाहक मानला जातो.
स्थानिक बोलीभाषेत ‘मिरग’ म्हणून ओळखला जाणारा हा किडा रोहिणी नक्षत्राच्या उत्तरार्धात अचानक जमिनीवर दिसू लागतो. त्याच्या आगमनानंतर काही दिवसांतच पावसाच्या सरी कोसळतात, असा पिढ्यानपिढ्या आलेला अनुभव आहे. त्यामुळे आधुनिक हवामान अंदाज प्रणाली उपलब्ध असतानाही ग्रामीण भागातील अनेक शेतकरी आजही मिरग किड्याच्या दर्शनावरून पावसाचा अंदाज बांधतात.
विशेष म्हणजे हा किडा पूर्णपणे निरुपद्रवी आहे. त्याला हातावर घेतल्यास तो चावत नाही किंवा कोणतीही इजा करत नाही. उलट स्वतःचे संरक्षण करण्यासाठी तो शरीर आखडून छोट्याशा लाल गोळ्यासारखा शांत पडून राहतो. त्याचे हे मखमली रूप लहान मुलांना आकर्षित करते, तर अनुभवी शेतकऱ्यांसाठी ते समाधान आणि आशेचे प्रतीक मानले जाते.
कोकणातील पारंपरिक कृषी संस्कृतीमध्ये या किड्याला विशेष महत्त्व आहे. शेतकरी मिरग किडा दिसू लागल्यानंतर शेतीची मशागत, पेरणी आणि इतर कामांचे नियोजन सुरू करतात. त्यामुळे हा छोटासा जीव ग्रामीण जीवनाचा आणि शेती संस्कृतीचा अविभाज्य भाग बनला आहे.
वैज्ञानिक दृष्टिकोनातून पाहता मिरग किड्याचे जीवनचक्र आजही अनेकांसाठी गूढच आहे. हा किडा वर्षभर जमिनीखाली कोणत्या अवस्थेत राहतो, त्याचा जन्म कसा होतो आणि मृग नक्षत्र संपल्यानंतर तो अचानक कुठे नाहीसा होतो, याविषयी स्पष्ट माहिती उपलब्ध नाही. मात्र निसर्गाच्या चक्रात त्याची भूमिका अत्यंत महत्त्वाची मानली जाते.
अल्पकाळासाठी पृथ्वीवर येणारा हा मखमली जीव कोकणातील माती, शेती आणि पावसाशी जोडलेले एक अद्वितीय नाते जपताना दिसतो. पावसाची वर्दी देऊन पुन्हा जमिनीच्या कुशीत विलीन होणारा ‘मिरग’ किडा आजही निसर्गाच्या गूढ आणि मोहक रूपाची जाणीव करून देतो.

