(रत्नागिरी / वार्ताहर)
फिनोलेक्स इंडस्ट्रीज लिमिटेड (FIL) आणि मुकुल माधव फाउंडेशन (MMF) यांच्या संयुक्त विद्यमाने रत्नागिरी तालुक्यातील फणसोप-कसोप परिसरातील गरजू शेतकऱ्यांना उच्च दर्जाच्या भात बियाण्यांचे वाटप करण्यात आले. गेल्या १२ वर्षांपासून सातत्याने राबविण्यात येणाऱ्या या उपक्रमामुळे परिसरातील शेतकऱ्यांना दर्जेदार बियाणे उपलब्ध होत असून शेती उत्पादनवाढीस मोठी मदत होत आहे.
या उपक्रमांतर्गत कसोप, फणसोप, कुर्ली, वायंगणी आणि मागलाड या पाच गावांतील शेतकऱ्यांना भात बियाण्यांचे वितरण करण्यात आले. या बियाण्यांच्या माध्यमातून ५० एकरांहून अधिक क्षेत्र लागवडीखाली येणार असून, यंदाच्या हंगामात चांगल्या उत्पादनाची अपेक्षा शेतकऱ्यांकडून व्यक्त केली जात आहे.
फिनोलेक्स इंडस्ट्रीज गेल्या ४५ वर्षांपासून देशभरात विविध सामाजिक उपक्रम राबवत आहे. महिला सक्षमीकरण, शेतकरी कल्याण, बालकांचे शिक्षण तसेच ग्रामीण विकासासाठी कंपनीकडून सातत्याने विविध समाजोपयोगी उपक्रम हाती घेतले जातात. त्याचाच एक भाग म्हणून हा भात बियाणे वाटप उपक्रम राबविण्यात आला.
फणसोप सहकारी संस्थेचे अध्यक्ष तसेच फणसोप ग्रामपंचायतीच्या सरपंच यांच्या विनंतीनुसार या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. फणसोप विविध कार्यकारी सहकारी सोसायटीच्या सहकार्याने झालेल्या या कार्यक्रमाला पंचायत समिती सदस्या सौ. संजना साळवी, सोसायटीचे प्रतिनिधी मनोज साळवी, राजेंद्र साळवी, समीर साळवी, तुषार साळवी तसेच माजी सरपंच गिरिराज साळवी उपस्थित होते. याशिवाय डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ, दापोली येथील विद्यार्थ्यांनीही कार्यक्रमात सहभाग घेतला.
फिनोलेक्स इंडस्ट्रीज आणि मुकुल माधव फाउंडेशनतर्फे रामबाबू संका (डायरेक्टर टेक्निकल), सागर चिवटे (फॅक्टरी मॅनेजर), आशिष आठवले (सिनिअर ऑफिसर – लायझनिंग) आणि शामराव निंबाळकर (सीएसआर ऑफिसर) उपस्थित होते.
संस्थेकडून ग्रामीण भागात शेती आणि समाजोपयोगी विविध उपक्रम सातत्याने राबविले जात आहेत. मोगरा लागवड, भाजीपाला लागवड, आधुनिक शेतीविषयक प्रशिक्षण तसेच ग्रामविकासासाठी विविध मार्गदर्शन कार्यक्रम आयोजित केले जातात. या उपक्रमांमुळे शेतकऱ्यांना आर्थिक बळ मिळत असून ग्रामीण भागातील शाश्वत विकासाला चालना मिळत असल्याची भावना उपस्थितांनी व्यक्त केली.
मुकुल माधव फाउंडेशनच्या संस्थापिका तथा फिनोलेक्स इंडस्ट्रीज लिमिटेडच्या संचालिका रितू छाब्रिया यांच्या मार्गदर्शनाखाली ग्रामीण भागातील शेतकरी आणि गरजू कुटुंबांच्या सर्वांगीण विकासासाठी विविध उपक्रम राबविण्यात येत आहेत. समाजोपयोगी कार्यातून ग्रामीण समाजाच्या सक्षमीकरणासाठी आपली बांधिलकी कायम ठेवण्याचा फाउंडेशनचा प्रयत्न असून, या उपक्रमांमुळे शेतकरी आणि ग्रामस्थांमध्ये समाधान आणि विश्वासाची भावना निर्माण झाली आहे.

