( मुंबई )
एका खासगी कंपनीच्या लेखा परीक्षणादरम्यान 98 लाख रुपयांचा कर लावण्याची धमकी देत प्रकरण मिटवण्यासाठी 20 लाख रुपयांची लाच मागणाऱ्या केंद्रीय वस्तू व सेवा कर विभागाच्या (CGST) अधीक्षकाला सीबीआयने मुंबईत अटक केली आहे. अंकित अगरवाल असे अटक करण्यात आलेल्या अधिकाऱ्याचे नाव आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, संबंधित कंपनीचे लेखा परीक्षण करताना अगरवालने कंपनीच्या संचालकांना 98 लाख रुपयांच्या कराची नोटीस देण्याची भीती दाखवली. हे प्रकरण पुढे नेऊ नये यासाठी त्याने 20 लाख रुपयांची लाच मागितली. चर्चेनंतर लाचेची रक्कम 17 लाख रुपयांवर ठरवण्यात आली.
या प्रकारामुळे कंपनीच्या संचालकांनी सीबीआयकडे तक्रार दाखल केली. तक्रारीनंतर सीबीआयने सापळा रचत लाचेचा पहिला हप्ता म्हणून 5 लाख रुपये स्वीकारताना अंकित अगरवालला रंगेहाथ अटक केली.
अटकेनंतर सीबीआयने अगरवालच्या निवासस्थानी झडती घेतली. या झडतीत 18 लाख 30 हजार रुपयांची रोख रक्कम, तसेच 40 लाख आणि 32 लाख रुपयांच्या मालमत्तेशी संबंधित कागदपत्रे जप्त करण्यात आली आहेत.
सीबीआयच्या प्राथमिक तपासानुसार, एका खासगी कंपनीचे लेखा परीक्षण सुरू असतानाच अधिकाऱ्याने कर कारवाईची भीती दाखवून लाच मागितल्याचे स्पष्ट झाले आहे. या प्रकरणाचा पुढील तपास सीबीआयकडून सुरू आहे.

