(मुंबई)
राज्याचे अन्न व औषध प्रशासन मंत्री नरहरी झिरवळ यांच्या मंत्रालयीन विभागात गुरुवारी सायंकाळी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (ACB) मोठी कारवाई केली. मंत्री कार्यालयातील कारकून राजेंद्र ढेरंगे यांना वैद्यकीय परवाना म्हणजेच केमिस्ट लायसन्स प्रकरणात लाच स्वीकारताना रंगेहात अटक करण्यात आली आहे. या कारवाईमुळे मंत्रालयातील कामकाज आणि पारदर्शकतेवर पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे.
केमिस्ट लायसन्ससाठी लाच मागणीचा आरोप
तक्रारदाराच्या म्हणण्यानुसार, केमिस्ट लायसन्स मंजुरीसाठी ढेरंगे यांनी सुरुवातीला ५० हजार रुपयांची लाच मागितली होती. चर्चेनंतर हा व्यवहार ३५ हजार रुपयांवर ठरल्याचे सांगितले जाते. तक्रार प्राप्त झाल्यानंतर लाचलुचपत प्रतिबंधक विभाग ने पडताळणी करून मंत्रालयातील अन्न व औषध प्रशासन विभागात सापळा रचला. गुरुवारी सायंकाळी सुमारे ६ वाजून ६ मिनिटांच्या सुमारास ढेरंगे यांनी लाच स्वीकारताच ACB च्या पथकाने त्यांना ताब्यात घेतले.
खासगी सचिवाच्या नावाचा उल्लेख, चौकशी सुरू
सूत्रांच्या माहितीनुसार, प्राथमिक चौकशीत ढेरंगे यांनी मंत्री नरहरी झिरवळ यांचे खासगी सचिव रामदास गाडे यांच्या सांगण्यावरून पैसे मागितल्याचा उल्लेख केल्याचे समजते. मात्र या दाव्याची अधिकृत पुष्टी झालेली नसून, ACB कडून सखोल तपास सुरू आहे.
केमिस्ट परवाना प्रकरण आधीपासून वादात
गेल्या काही दिवसांपासून केमिस्ट परवान्यांसाठी लाच मागितली जात असल्याच्या तक्रारी समोर येत होत्या. “पैसे दिल्याशिवाय फाईल पुढे सरकत नाही,” अशी भावना अनेक तक्रारदारांकडून व्यक्त केली जात होती. अखेर या तक्रारींच्या पार्श्वभूमीवर थेट मंत्री कार्यालयात कारवाई झाल्याने या प्रकरणाला मोठे महत्त्व प्राप्त झाले आहे.
या घटनेनंतर विरोधकांनी राज्य सरकारवर तीव्र टीका सुरू केली आहे. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी सोशल मीडियावर प्रतिक्रिया देत मंत्रालयात खुलेआम लाचखोरी सुरू असल्याचा आरोप केला. मंत्र्यांच्या कार्यालयातच ACB ला सापळा रचावा लागणे ही गंभीर बाब असल्याचे त्यांनी नमूद केले आहे.
ACB च्या या कारवाईमुळे मंत्रालयातील भ्रष्टाचाराचा मुद्दा पुन्हा चर्चेत आला आहे. पुढील चौकशीत या प्रकरणात आणखी कोणाची भूमिका समोर येते का, तसेच जबाबदारी कुणावर निश्चित होते, याकडे आता संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे.

