(अहिल्यानगर / कर्जत)
देशभरात गाजलेल्या NEET परीक्षेतील कथित पेपरफुटी, निकालातील गोंधळ आणि त्यानंतर निर्माण झालेल्या मानसिक तणावाच्या पार्श्वभूमीवर आणखी एक अत्यंत दुर्दैवी घटना समोर आली आहे. अहिल्यानगर जिल्ह्यातील कर्जत तालुक्यातील जलालपूर येथे 19 वर्षीय विद्यार्थिनीने राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केली. डॉक्टर होण्याचे स्वप्न अपूर्ण राहिल्याची वेदना व्यक्त करत तिने सुसाईड नोटही लिहून ठेवल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. या घटनेमुळे संपूर्ण परिसरात शोककळा पसरली असून विद्यार्थ्यांवरील वाढत्या मानसिक तणावाचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.
अपेक्षित गुण न मिळाल्याने नैराश्य
मृत विद्यार्थिनीचे नाव अंकिता सुरेश सांगळे (वय 19) असे आहे. कुटुंबीयांनी दिलेल्या माहितीनुसार, अंकिता डॉक्टर होण्याचे स्वप्न घेऊन NEET परीक्षेची तयारी करत होती. तिला परीक्षेत 300 हून अधिक गुण मिळण्याची अपेक्षा होती, मात्र प्रत्यक्षात 166 गुण मिळाल्याने ती गेल्या काही दिवसांपासून मानसिक तणावाखाली होती. कुटुंबीयांनी तिची समजूत काढण्याचा प्रयत्न केला होता. मात्र अपेक्षाभंगामुळे ती नैराश्यात गेल्याचे सांगितले जात आहे.
वडील पंढरपूरला गेले आणि घडली दुर्दैवी घटना
शनिवार, 25 जुलै रोजी सायंकाळी साडेचारच्या सुमारास ही घटना घडली. अंकिताचे वडील सुरेश सांगळे आणि तिचा भाऊ पंढरपूर येथे देवदर्शनासाठी गेले होते. घरात तिची आई एकटी होती. अंकितासाठी अभ्यासाची स्वतंत्र खोली होती. बराच वेळ ती खोलीतून बाहेर न आल्याने आईने दरवाजा उघडून पाहिले. त्यावेळी अंकिताने गळफास घेतल्याचे निदर्शनास आले. आईने तातडीने शेजाऱ्यांना बोलावले आणि पोलिसांना माहिती देण्यात आली.
पोलिस घटनास्थळी दाखल; सुसाईड नोट जप्त
घटनेची माहिती मिळताच पोलीस निरीक्षक हनुमान गायकवाड यांच्यासह पोलिसांचे पथक घटनास्थळी दाखल झाले. पंचनामा करून मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला. पोलिसांना घटनास्थळी सुसाईड नोट देखील मिळाली. त्यामध्ये अंकिताने NEET परीक्षेत अपेक्षित यश मिळाले नसल्याने नैराश्यात असल्याचा उल्लेख केला आहे. तसेच आपल्या मृत्यूसाठी आई-वडील किंवा भावाला जबाबदार धरू नये, असेही तिने स्पष्टपणे नमूद केल्याची माहिती तपासातून समोर आली आहे. या प्रकरणी कर्जत पोलीस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली असून पुढील तपास सुरू आहे.
अंकिताच्या निधनाने जलालपूर गावासह संपूर्ण कर्जत तालुक्यात शोककळा पसरली आहे. डॉक्टर होण्याचे स्वप्न उराशी बाळगणाऱ्या एका गुणवंत विद्यार्थिनीने नैराश्यातून जीवन संपवल्याने नागरिकांनी दुःख व्यक्त केले आहे.
खासदार निलेश लंके यांनी घेतली कुटुंबीयांची भेट
घटनेची माहिती मिळताच खासदार निलेश लंके यांनी पीडित कुटुंबीयांची भेट घेऊन सांत्वन केले. विद्यार्थिनीच्या मृत्यूबाबत दुःख व्यक्त करत त्यांनी हा गंभीर विषय संसदेच्या अधिवेशनात उपस्थित करणार असल्याचे सांगितले. त्यांनी विद्यार्थ्यांवरील मानसिक तणाव, परीक्षांमधील अनिश्चितता आणि पेपरफुटीसारख्या घटनांमुळे निर्माण होणाऱ्या परिस्थितीवर गंभीर चर्चा होण्याची गरज असल्याचेही नमूद केले.
विद्यार्थ्यांच्या मानसिक आरोग्याचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर
NEET परीक्षेतील कथित पेपरफुटी, निकालावरील वाद आणि त्यानंतर देशभरात झालेल्या आंदोलनांमुळे अनेक विद्यार्थी मानसिक तणावाखाली असल्याचे वारंवार समोर येत आहे. शिक्षण व्यवस्थेवरील विश्वास, स्पर्धा परीक्षांतील ताण आणि विद्यार्थ्यांना मानसिक आधार देण्यासाठी प्रभावी यंत्रणा उभारण्याची गरज या घटनेनंतर पुन्हा अधोरेखित झाली आहे.

