(संगमेश्वर / प्रतिनिधी)
ग्रामीण भागातील जनतेच्या हक्काच्या विकासकामांमध्ये होणारी दिरंगाई, निकृष्ट दर्जाचे काम आणि प्रशासकीय हलगर्जीपणा कोणत्याही परिस्थितीत सहन केला जाणार नाही. कामात निष्काळजीपणा करणाऱ्या कंत्राटदारांना पाठीशी न घालता त्यांच्यावर कठोर कारवाई करून काळ्या यादीत टाका, असे स्पष्ट निर्देश जिल्हा परिषद सदस्य प्रमोद अधटराव यांनी अधिकाऱ्यांना दिले.
कोसुंब जिल्हा परिषद गटाची प्रभाग समिती बैठक गुरुवारी आंबव येथे पार पडली. जिल्हा परिषद सदस्य प्रमोद अधटराव यांच्या अध्यक्षतेखाली झालेली ही बैठक प्रलंबित विकासकामे आणि प्रशासनाच्या संथ कारभारावरून चांगलीच गाजली. बैठकीत लोकप्रतिनिधींनी विविध प्रश्नांवरून अधिकाऱ्यांना जाब विचारत कामांचा वेग वाढविण्याची मागणी केली. या बैठकीत कोसुंब गटातील विविध गावांमधील रस्ते, पाणीपुरवठा, तसेच मूलभूत सुविधांशी संबंधित विकासकामांचा सविस्तर आढावा घेण्यात आला. अनेक ठिकाणी मंजूर झालेली कामे अद्याप अपूर्ण असल्याचे तसेच वारंवार सूचना देऊनही काही कंत्राटदारांकडून कामांमध्ये दिरंगाई केली जात असल्याचे सरपंच आणि सदस्यांनी निदर्शनास आणून दिले.
“जनतेच्या पैशातून होणाऱ्या विकासकामांमध्ये हलगर्जीपणा अजिबात चालणार नाही. कामाचा दर्जा राखला जात नसेल किंवा वेळेत काम पूर्ण होत नसेल, तर संबंधित कंत्राटदारांवर कठोर कारवाई करण्यात यावी. जनतेचा वेळ आणि निधी वाया घालवणाऱ्यांना कोणतीही सवलत दिली जाणार नाही,” अशा शब्दांत प्रमोद अधटराव यांनी प्रशासनाला सुनावले. बैठकीत पंचायत समितीचे उपसभापती प्रफुल्ल बाईत यांनीही विकासकामांच्या गुणवत्तेवर प्रश्न उपस्थित करत अधिकाऱ्यांनी प्रत्यक्ष स्थळी जाऊन कामांची पाहणी करण्याची गरज व्यक्त केली. प्रलंबित कामांना निश्चित कालमर्यादा देऊन ती पूर्ण करण्याचे निर्देश यावेळी देण्यात आले.
बैठकीत ग्रामीण भागातील विकासकामांना गती देण्यासाठी काही महत्त्वपूर्ण निर्देश देण्यात आले. कामांमध्ये हलगर्जीपणा करणाऱ्या तसेच निकृष्ट दर्जाचे काम करणाऱ्या कंत्राटदारांवर तातडीने दंडात्मक कारवाई करून त्यांना काळ्या यादीत टाकण्याच्या सूचना देण्यात आल्या. तसेच प्रलंबित आणि अपूर्ण विकासकामे निश्चित कालमर्यादेत पूर्ण करण्यासाठी संबंधित अधिकाऱ्यांना डेडलाईन देण्यात आली. ग्रामसेवकांनी केवळ कागदोपत्री पाठपुरावा न करता प्रत्यक्ष कामाच्या ठिकाणी भेट देऊन गुणवत्तेची पाहणी करावी आणि त्याचा नियमित अहवाल सादर करावा, असे स्पष्ट निर्देश यावेळी देण्यात आले.
या बैठकीला पंचायत समिती सदस्य दुर्वा पाष्टे, वैभव यादव, समीर चाळके, देवा भाट्ये यांच्यासह कोसुंब गटातील विविध गावांचे सरपंच, पंचायत समितीचे वरिष्ठ अधिकारी आणि ग्रामसेवक उपस्थित होते. ग्रामीण विकासाच्या प्रश्नांवर लोकप्रतिनिधींनी घेतलेल्या आक्रमक भूमिकेमुळे प्रशासनाची चांगलीच धावपळ उडाली असून, आता प्रलंबित कामांना गती मिळणार का, याकडे नागरिकांचे लक्ष लागले आहे.

