(गणपतीपुळे / वैभव पवार)
रत्नागिरी तालुक्यातील श्री क्षेत्र गणपतीपुळे ग्रामपंचायतीच्या सार्वत्रिक निवडणुकीची प्रक्रिया आता वेग घेऊ लागली असून सदस्य पदांच्या आरक्षण सोडतीचा कार्यक्रम शुक्रवार, दि. १२ जून रोजी आयोजित करण्यात आला आहे. दुपारी ३ वाजता गणपतीपुळे ग्रामपंचायत कार्यालयात विशेष ग्रामसभेच्या माध्यमातून प्रभागनिहाय आरक्षण निश्चित करण्यात येणार आहे.
राज्य निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार राज्यातील सन २०२४, २०२५ तसेच सन २०२६ मध्ये मुदत संपणाऱ्या आणि नव्याने स्थापन होणाऱ्या ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकांसाठी सदस्य पदाच्या आरक्षण आरक्षणासाठी कार्यक्रम जाहीर करण्यात आला आहे. त्यानुसार मुंबई ग्रामपंचायत अधिनियम १९६६ मधील सुधारित तरतुदींनुसार गणपतीपुळे ग्रामपंचायतीची मुदत समाप्त झाल्याने नव्या निवडणुकीसाठी आरक्षण सोडतीची प्रक्रिया राबविण्यात येत आहे.
या विशेष ग्रामसभेला मालगुंड तलाठी कार्यालयाचे मंडळ अधिकारी अरुण जाधव प्रमुख उपस्थित राहणार आहेत. ग्रामसभेमध्ये ग्रामपंचायतीच्या विविध प्रभागांचे आरक्षण निश्चित करण्यात येणार असून याबाबत सर्व ग्रामस्थांनी वेळेवर उपस्थित राहावे, असे आवाहन रत्नागिरीचे तहसीलदार राजाराम म्हात्रे यांनी जाहीर नोटीसद्वारे केले आहे.
दरम्यान, गणपतीपुळे ग्रामपंचायतीच्या आगामी निवडणुकीसाठी अनेक नवीन चेहरे सदस्य पदासाठी इच्छुक असल्याची चर्चा सुरू झाली आहे. त्यामुळे आरक्षण सोडतीकडे इच्छुक उमेदवारांचे विशेष लक्ष लागले आहे. तसेच विविध राजकीय पक्षांचे कार्यकर्ते, स्थानिक पॅनेल उभे करण्याच्या तयारीत असलेले ग्रामस्थ आणि निवडणूक इच्छुक यांच्यातही राजकीय हालचालींना वेग आला असून ग्रामपंचायत निवडणुकीची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे.

