(नवी दिल्ली)
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भारताच्या राजकारणात आणखी एक ऐतिहासिक टप्पा गाठला आहे. सलग सर्वाधिक काळ पदभार सांभाळणारे निवडून आलेले पंतप्रधान म्हणून त्यांनी देशाचे पहिले पंतप्रधान जवाहरलाल नेहरू यांचा विक्रम मोडला आहे. या पार्श्वभूमीवर NDA सरकारची 12 वर्षे पूर्ण झाल्याचा आनंद साजरा करण्यासाठी बुधवारी नवी दिल्लीत विशेष बैठक आयोजित करण्यात आली होती.
‘भारत मंडपम’ येथे झालेल्या या बैठकीत NDA आघाडीतील सर्व प्रमुख नेते, भाजपचे वरिष्ठ पदाधिकारी, तसेच NDAची सत्ता असलेल्या 22 राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांचे मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री उपस्थित होते. यावेळी पंतप्रधान मोदी यांनी भावनिक भाषण करत NDA नेत्यांचे आभार मानले.
“तुम्ही सर्वांनी हा दिवस माझ्यासाठी अविस्मरणीय केला,” असे म्हणत मोदी यांनी भारत मातेची सेवा करण्याची संधी मिळणे हे ईश्वराचे आशीर्वाद असल्याचे सांगितले. जनतेची सेवा ही नेहमीच एक आध्यात्मिक साधना मानली असून हा प्रवास सामूहिक यज्ञासारखा असल्याचे त्यांनी नमूद केले.
‘चरैवेति-चरैवेति’ या मंत्राचा उल्लेख करत मोदी म्हणाले की, राजकीय जीवनात अनेक चढ-उतार आले, पण इतक्या मोठ्या टप्प्यापर्यंत पोहोचू असे कधी वाटले नव्हते. सलग सर्वाधिक काळ निवडून आलेले पंतप्रधान म्हणून सेवा करण्याची संधी मिळणे हे माझे मोठे भाग्य असल्याचे त्यांनी सांगितले.
भाषणादरम्यान मोदी यांनी काँग्रेसवरही जोरदार टीका केली. काँग्रेस सरकारच्या काळात देश हजारो कोटींच्या घोटाळ्यांमध्ये अडकला होता, असा आरोप त्यांनी केला. “2014 मध्ये NDA सरकार सत्तेत आल्यानंतर देशाचे नशीब बदलले,” असे म्हणत त्यांनी विकासासाठी स्पष्ट हेतू, योग्य धोरण आणि निर्णायक नेतृत्व आवश्यक असल्याचे सांगितले.
‘हिंदू ग्रोथ रेट’ या संकल्पनेवरूनही मोदी यांनी काँग्रेसवर निशाणा साधला. देशाच्या विकासातील अपयशाचा ठपका हिंदू समाजावर ठेवण्यात आला, अशी टीका करत त्यांनी “त्याला ‘काँग्रेस ग्रोथ रेट’ म्हणायला हवे होते,” असे म्हटले.
मोदी यांनी माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांच्या नेतृत्वाचाही उल्लेख केला. NDA सरकारच्या काळातच विकासाला खरी गती मिळाल्याचे सांगत त्यांनी 2004 नंतर देश पुन्हा अस्थिरतेच्या भोवऱ्यात अडकल्याचा आरोप काँग्रेसवर केला.
कार्यकाळाच्या दृष्टीने पाहता, नरेंद्र मोदी यांनी आता जवाहरलाल नेहरू यांचा 4,398 दिवसांचा विक्रम मागे टाकला आहे. 26 मे 2014 रोजी प्रथमच पंतप्रधानपदाची सूत्रे स्वीकारल्यानंतर त्यांनी 2019 आणि 2024 मध्येही विजय मिळवत सलग तिसऱ्यांदा सत्ता कायम राखली आहे.

